सुधाकर बडगुजरांना एसीबी़कडून आठ दिवसांची मुदत 

सुधाकर बडगुजरांना एसीबी़कडून आठ दिवसांची मुदत 

नाशिक : पुढारी वृत्तसेवानाशिक महापालिकेतील अपहार, फसवणूक व बनावट दस्तऐवजीकरणासंदर्भात माजी नगरसेवक तथा शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची शुक्रवारी (दि.२२) लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामार्फत पुन्हा चौकशी करण्यात आली. बडगुजर अपेक्षित उत्तरे देत नसल्याने, त्यांना आठ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. आतापर्यंत केलेल्या चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.

तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सन २०१६ मध्ये बडगुजर यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून 'एसीबी'कडे अपहाराबाबत खुली चौकशी सुरू होती. चौकशीअंती बडगुजर यांच्यासह संशयित साहेबराव शिंदे आणि सुरेश चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नगरसेवकपदावर असताना महापालिकेत कोणतेही कॉन्ट्रॅक्ट घेता येत नाही. परंतु, बडगुजर यांनी संबंधित कंपनीला महापालिकेचे ठेके मिळवून दिले. स्वत: कंपनीमार्फत सन २००६ ते २००९ या कालावधीत ३३ लाख ६९ हजार ४३९ रुपये स्वीकारून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतल्याची तक्रार आहे. यासंदर्भात शुक्रवारी एसीबीकडून त्यांची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीत बडगुजर अपेक्षित उत्तरे देत नसल्याने, त्यांनी अजून काही कागदपत्रे मिळविण्यासाठी अवधी मागितला आहे. त्यानुसार बडगुजर यांना आठ दिवसांचा अवधी दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या चौकशीअंती बडगुजर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. न्यायालयाच्या निकालाची प्रतदेखील एसीबीकडे दिली आहे. आणखी काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ मागविला असून, पुन्हा १० जानेवारी रोजी चौकशीला बोलाविले आहे. – सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (उबाठा गट)

बडगुजर यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. अजून काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना काही कागदपत्रे मागवायची असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी त्यांना थोडा वेळ हवाय. आम्ही साधारणपणे आठ दिवसांची मुदत देतोय. प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होत आहे. कंपनीच्या माध्यमातून बडगुजर यांचे सहा कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर येत आहे. – शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, एसीबी

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news