Stock Market Updates : जागतिक सकारात्मक संकेत असतानाही आज मंगळवारी (दि. २४) भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. तिसर्या तिमाहीतील कॉर्पोरेट कंपन्यांच्या मजबूत कमाईचा शेअर बाजारातील सुरुवातीच्या तेजीला आधार मिळाला होता. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २३० अंकांनी वाढून ६१ हजारांवर होता. त्यानंतर दुपार २ च्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी गमावली आणि स्थिर पातळीवर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ३७ अंकांच्या किरकोळ वाढीसह ६०,९७८ वर बंद झाला. तर निफ्टी १८,११८ वर स्थिरावला.
आजच्या व्यवहारात ॲक्सिस बँक आणि पॉवर ग्रिड हे सेन्सेक्सवर सर्वाधिक २ टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे मारुती शेअर्स २ टक्क्यांनी वाढला. आयटी शेअर्स आणि एचडीएफसीच्या दोन्ही शेअर्समध्येही लक्षणीय वाढ झाली. रिॲल्टी निर्देशांक १ टक्क्यांनी घसरला, तर माहिती तंत्रज्ञान निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला. बीएसई ऑटो निर्देशांक १ टक्क्यांनी वधारला होता. टाटा मोटर्सचा शेअर ३.११ टक्क्यांनी वाढून ४२१ रुपयांवर पोहोचला. मारुती, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, एमआरएफ, अशोक लेलँड, एम अँड एम या शेअर्संनी हिरव्या रंगात व्यवहार केला.
टाटा मोटर्स, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टायटन, एचडीएफसी लाईफ, टीसीएस, मारुती सुझूकी हे आजच्या व्यवहारात टॉप गेनर्स होते. तर ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, हिंदाल्को, टाटा स्टील, भारती एअरटेल, ग्रासीम, एसबीआय लाईफ, सन फार्मा, कोटक बँक आणि डॉ रेड्डी हे टॉप लूजर्स ठरले.
Axis बँकेच्या शेअरची किंमत २.६० टक्क्यांनी घसरून ९०९.१० रुपये झाली. ॲक्सिस बँकेचे शेअर्स गेल्या ६ महिन्यांत २४ टक्क्यांनी वाढले आहेत. तर गेल्या ५ वर्षांत जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा शेअर ४ जानेवारी २०२३ रोजी ९७० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. तर २३ जून २०२२ रोजी तो ६१८ रुपयांवर होता.
अमेरिकेच्या शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सोमवारी तेजीत बंद झाले होते. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. जपानमधील निक्केई २२५ निर्देशांक १.४६ टक्के म्हणजेच ३९३ अंकांनी वाढून २७,२९९ वर पोहोचला, तर टॉपिक्स निर्देशांक १.४२ टक्के म्हणजेच २७ अंकांनी वाढून १,९७२ वर बंद झाला. चीन, हाँगकाँग, तैवान, दक्षिण कोरिया, मलेशिया आणि सिंगापूरमधील शेअर बाजार सुट्टीमुळे बंद राहिले. (Stock Market Updates)
हे ही वाचा :