पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात शुक्रवारी नफावसुली दिसून आली. मुख्यतः आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील घसरणीमुळे बाजाराचा मूड बिघडला. यामुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरून ७०,४०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २१,३०० च्या खाली घसरला. त्यानंतर सेन्सेक्स ३५९ अंकांच्या घसरणीसह ७०,७०० वर स्थिरावला. तर निफ्टी १०१ अंकांनी घसरून २१,३५२ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)
क्षेत्रीय पातळीवर पॉवर निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला, तर बँक, एफएमसीजी, हेल्थकेअर, आयटी प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. BSE मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढून बंद झाला. आज सुमारे १,८११ शेअर्स वाढले, तर १,४२२ शेअर्स घसरले आणि ५६ शेअर्समध्ये काही बदल दिसून आला नाही.
जागतिक संमिश्र संकेत, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री, कच्च्या तेलाच्या दरात वाढ आदी घटकही बाजारातील घसरणीला कारणीभूत ठरले.
टेक महिंद्राच्या कमकुवत कमाईचे पडसाद टेक शेअर्समधील व्यवहारात दिसून आले. तर एचडीएफसी बँकेच्या शेअर्सची विक्री कायम राहिल्याने बँकिंग स्टॉक्सना मोठा फटका बसला.
सेन्सेक्स आज ७१,०२२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७०,३२० च्या खाली आला. सेन्सेक्सवर टेक महिंद्राचा शेअर्स ६ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर भारती एअरटेल २ टक्क्यांहून अधिक घसरला. एचसीएल टेक, आयटीसी, एशियन पेंट्स, विप्रो, नेस्ले इंडिया, सन फार्मा, एचडीएफसी बँक, कोटक बँक, टीसीएस, मारुती हे शेअर्स १ टक्क्यांहून अधिक घसरले. तर एनटीपीसी, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स हे शेअर्स वाढले.
निफ्टीवर टेक महिंद्रा, सिप्ला, भारती एअरटेल, LTIMindtree, एसबीआय लाईफ हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर बजाज ऑटो, अदानी पोर्टस, कोल इंडिया, एनटीपीसी, इंडसइंड बँक हे टॉप गेनर्स होते.
आजच्या सत्रात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आणखी २ टक्क्यांनी घसरण झाली. आज हा शेअर्स १,४१९ रुपयांपर्यंत खाली आला. एयू स्मॉल फायनान्स बँक ४ टक्क्यांनी आणि अॅक्सिस बँक २ टक्क्यांनी घसरला. बंधन बँक, कोटक बँक हेदेखील घसरले. यामुळे निफ्टी बँक १ टक्क्यांनी खाली आला.
निफ्टीवर टेक महिंद्राचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स आज ६ टक्क्यांहून अधिक घसरून १,३१२ रुपयांपर्यंत खाली आला. कारण या आयटी कंपनीने बुधवारी तिमाही कमाईचे निकाल जाहीर केले. ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिसर्या तिमाहीत आयटी सेवा क्षेत्रातील प्रमुख टेक महिंद्राच्या निव्वळ नफ्यात ६० टक्के घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. त्याचबरोबर LTIMindtree, कॉफोर्ज, एल अँड टी टेक्नोलॉजी सर्व्हिसेस, पर्सिस्टेंट सिस्टम्स यांचे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. (Stock Market Closing Bell)
अमेरिकेचा गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा साठा अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे. तर चीनच्या मध्यवर्ती बँकेने बँकांच्या रिझर्व्ह रेशोमध्ये केलेल्या कपातीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूडचा मार्च कॉन्ट्रॅक्ट दर ०.३१ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८०.२९ डॉलर झाला. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ०.४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७५.३९ डॉलरवर पोहोचला.
NSE वरील आकडेवारीनुसार, २४ जानेवारी रोजी परदेशी संस्थात्मक/पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ६,९३४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. दरम्यान, देशांतर्गंत गुंतवणूकदारांनी (DII) ६,०१२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी करुन गुंतवणूक केली. परदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात आतापर्यंत १९,३०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.
हे ही वाचा :