पुढारी ऑनलाईन : गुंतवणूकदारांचे ऑक्टोबरच्या देशांतर्गत किरकोळ महागाई दराकडे लक्ष लागले आहे. या पाश्वभूमीवर आज सोमवारी (दि.१३) भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. रविवारच्या मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्रातील तेजी सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात कायम राहिली नाही. आज सेन्सेक्स ३२५ अंकांनी घसरून ६४,९३३ वर बंद झाला. तर निफ्टी ८२ अंकांच्या घसरणीसह १९,४४३ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात विशेषतः आयटी आणि फायनान्सियल स्टॉक्सना फटका बसला. आज सुमारे १,६५९ शेअर्स वाढले, २,०४३ शेअर्स घसरले. तर १३२ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.
संबंधित बातम्या
कमकुवत संकेतांमुळे आज बाजारात विक्री दिसून आली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी राहिली. आयटी, कन्झूमर ड्यूरेबल शेअर्समध्ये विक्री तर मेटल आणि पॉवर शेअर्समध्ये खरेदी झाली.
दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी घसरून ८३.३२ वर बंद झाला.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एचडीएफसी बँक, रिलायन्स हे शेअर्स घसरले. तर एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, एनटीपीसी हे शेअर्स तेजीत राहिले.
निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी रियल्टी निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले.
रविवारी संध्याकाळी झालेल्या विशेष ६० मिनिटांच्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे अर्ध्या टक्क्यांनी वाढल्याने संवत २०८० ची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी स्थिरतेने झाली होती. मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ३५५ अंकांनी म्हणजेच ०.५५ टक्क्यांनी वाढून ६५,२५९ वर बंद झाला होता. तर निफ्टी १०० अंकांनी म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी वाढून १९,५२६ वर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये पाच वर्षांतील सर्वोत्तम नफा नोंदवला होता.
आशियाई बाजारात आज संमिश्र वातावरण राहिले. या आठवड्यात जाहीर होणार्या अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा लागली आहे. या पार्श्वभूमीवर बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक ०.०५ टक्के म्हणजे १७ अंकांनी वाढून ३२,५८५ वर सपाट पातळीवर बंद झाला, तर व्यापक टॉपिक्स निर्देशांक ०.१० अंकांनी घसरून २,३३६.६२ वर बंद झाला.