पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक संकटाचा मुकाबला करणार्या श्रीलंका देशातील सर्वसामान्यांचे जगणं अधिक भयावह होत चालले आहे. रोजची भाकरीची तजवीज करण्यात कष्टकरी मेटाकुटीला आले आहेत. ( Sri Lanka Economic Crisis ) धक्कादायक बाब म्हणजे, वस्त्रोद्योगातील महिला कामगारांवर आपल्या कुटुंबाला संभाळण्यासाठी सेक्स वर्कर होण्याची वेळ आली असून, परिस्थिती अशीच राहिली तर श्रीलंकेतील सर्वसामन्यांच्या जगण्याची लढाई अधिक भीषण होण्याची शक्यताही व्यक्त आहे, असे वृत्त 'एएनआय'वृत्तसंस्थने दिले आहे.
देशावर आलेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील सर्वसामान्य नागरिक देशोधडीला लागले आहेत. हजाराे कामगारांना रोजगार गमवावे लागल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. जिवंत राहण्यासाठी अन्न व जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी संघर्ष हा अधिक भयावह हाेत चालला आहे. अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे जगणं दिवसोंदिवस अधिक बिकट होत चालेले आहे.
लैंगिक शोषणाविरोधात काम करणार्या स्टँड अप मूव्हमेंट लंका (एसयूएमएल ) या श्रीलंकेतील स्वंयसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'एसयूएमएल'ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील वेश्या व्यवसायात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण येथील वस्त्रोद्योगातील महिला कामगार 'सेक्स रॅकेट' जाळ्यात ओढळल्या जात आहेत.
वस्त्रोद्योगातील कारखाने बंद पडल्याने महिला कामगार देशोधडीला लागल्या आहेत. आता त्या आपल्या कुटुंबीयांच्या उपजीविकेसाठी काही स्पा आणि वेलनेस सेंटरमध्ये काम करतात. आपल्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी त्यांच्यावर ही वेळ आली आहे. 'एसयूएलएल'च्या कार्यकारी संचालक आशिला दांडेनिया यांनी सांगितले की, "श्रीलंकेतील वस्त्रोद्योगात काम करणार्या महिला कामगारांना आर्थिक संकटामुळे कामावरुन कमी करण्यात आले. बेरोजगारीची कुर्हाड कोसळल्याने कुटुंबाच्या उपजीविकेसाठी या महिला कामगारांना सेक्स वर्कर म्हणून काम करावे लागत आहे.".
सध्याच्या आर्थिक संकटात देशातील अनेक महिला कामगारांना वेश्या व्यवसाय करावा लागत आहे. यातील बहुतांश वस्त्रोद्योगातील महिला कामगार आहेत. कोरोना काळात कापड उद्योगांवर मोठा परिणाम झाला. अनेक कारखाने बंद पडल्याने महिला बेरोजगार झाल्या. आता उपजीविकेसाठी त्या वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकत आहेत, असेही दांडेनिया यांनी सांगितले.
दांडेनिया यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेला एका २१ वर्षीय तरुणीची काहानीच सांगितली. त्या म्हणाल्या, २१ वर्षीय तरुणी कापड कारखान्यात काम करुन आपल्या कुटुंबाचे उदननिर्वाह करत होती. सात महिन्यांपूर्वी तिची नोकरी गेली. तिने कित्येक महिने आर्थिक संकटाचा सामना केला. ती नैराश्यात गेली. यानंतर एका स्पा मालकाने तिच्याशी संपर्क केला. मात्र तिने असा व्यवसाय करण्यास नकार दिला. अखेर कुटुंबासाठी पैशांची नितांत गरज होती. कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून या तरुणीला नाईलाजास्तव वेश्या व्यवसायात जावे लागले. अशा देशात शेकडो महिला आहेत, वेश्या व्यवसायाच्या रॅकेटमध्ये सापडलेल्या काही मुली गर्भवतीही झाल्या असून, यातील दोघी मुलींची 'एसयूएलएल' काळजी घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रांमधील जागतिक अन्न कार्यक्रमाचे श्रीलंकेचे प्रतिनिधी अब्दुर रहीम सिद्दीकी यांनी सांगितले की, श्रीलंका सध्या मोठया आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पुढील काही महिन्यात प्रचंड महागाई वाढण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच अशा अन्नधान्याच्या तीव्र टंचाईचा देशाला सामना करावा लागत आहे. जून महिन्यापर्यंत अन्नधान्य चलनवाढीचा दर हा ८० टक्क्यांहून अधिक आहे. पुढील महिन्यांमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :