Manish Sisodia : दिल्लीतील मद्य दुकानदारांना ईडी, सीबीआयच्या धमक्या : मनीष सिसोदिया | पुढारी

Manish Sisodia : दिल्लीतील मद्य दुकानदारांना ईडी, सीबीआयच्या धमक्या : मनीष सिसोदिया

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तसेच केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) भाजप दिल्लीतील दुकानदार तसेच अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचा सनसनाटी आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी शनिवारी (दि.३०) केला आहे.

दिल्लीतील सर्व अधिकृत मद्याची दुकाने बंद करून अवैध दुकानांच्या माध्यमातून पैसा कमवण्याचा मानस भाजपचा असल्याचा आरोप देखील सिसोदियांनी (Manish Sisodia) केला. नवीन मद्य धोरणाला रोखण्याचा निर्णय घेतला असून सरकारी मद्याची दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे देखील ते म्हणाले.

भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी सरकारने नवीन मद्य धोरण आणले होते. यापूर्वी सरकारचे ८५० मद्याच्या दुकानातून जवळपास ६ हजार कोटी रुपयांचा महसुल मिळत होता. पंरतु, नवीन धोरणानंतर सरकारने याच दुकानांच्या माध्यमातून ९ हजार कोटी रुपयांहून अधिकचा महसुल मिळाला, असा दावा देखील सिसोदियांनी केला. नवीन धोरणामळे सरकारचा महसूल दीड पटीने वाढला असता यामुळेच नवीन धोरण अपयशी ठरवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.

मद्य दुकानांच्या संचालकांना ईडी मार्फत धमकावण्यात आले. या धमक्यांमुळे ते दुकान सोडून चालले आहेत. दिल्लीत आता मद्याची केवळ ४६८ दुकाने आहेत. भाजप गुजरात प्रमाणेच दिल्लीत नकली मद्याची विक्री करून बघत आहे. त्यामुळे गुजरात प्रमाणेच दिल्लीत देखील विषारी दारु पिल्याने मृत्यू होतील. पंरतु, आम्ही हे होवू देणार नाही. त्यामुळे १ ऑगस्टपासून दिल्लीत केवळ सरकारी दुकानातूनच मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला असून केवळ सरकारी मद्याची दुकानेच सुरू राहतील, असे सिसोदिया म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button