पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. अनेक स्टार क्रिकेटपटूंनी येथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. अगामी आयपीएल लिग स्पर्धा 31 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे, पण त्याआधी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी पाच युवा खेळाडूंच्या नावाचा उल्लेख करून हे खेळाडू आयपीएल 2023 मध्ये चमक दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
गांगुलींची पसंती पृथ्वी शॉला…
गांगुली (Sourav Ganguly) एका मुलाखतीदरम्यान म्हणाले, सूर्यकुमार यादव सध्या सर्वोत्तम आहे, पण तुम्ही त्याला तरुण मानू शकत नाही. पृथ्वी शॉमध्ये खूप प्रतिभा आहे. तो टी-20 फॉरमॅटमध्ये चमत्कार करू शकतो आणि तो अजूनही तरुण आहे. ऋषभ पंतही बरा आहे, पण 2022 साली कार अपघातात पंतला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि तो आयपीएलमध्ये खेळेल की नाही याबाबत येणा-या काळातच समजेल.' यानंतर गांगुलींनी ऋतुराज गायकवाडचे नाव घेत मी या खेळाडूवर लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले.
गांगुली (Sourav Ganguly) यांनी आपल्या यादीतील एकमेव वेगवान गोलंदाज उमरान मलिकला स्थान दिले आहे. उमरान हा सातत्याने तंदुरुस्त राहिला तर तो त्याच्या गतीच्या जोरावर खेळात सरस राहील, असेही मत दादांनी व्यक्त केले आहे. आयपीएल 2022 मधील 14 सामन्यांत त्याने 22 विकेट घेत आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. गांगुलींनी पाचवे नाव शुभमन गिलचे घेतले. गिलबद्दल विचारले असता दादा म्हणाले, 'मी त्याचे नाव चुकून विसरलो. पण मला माझ्या यादीत 5वा खेळाडू म्हणून गिलचा समावेश करायला आवडेल.'
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल 2022 मध्ये 10 संघ सहभागी झाले होते. त्यात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांनी आयपीएलमध्ये पदार्पण केले. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावले. अगामी आयपीएल हंगाम होम-अवे फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. जिथे संघ घरच्या मैदानावर 7 सामने खेळतील आणि उर्वरित सामने इतर मैदानांवर खेळतील.