पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतात होणाऱ्या वन-डे वर्ल्डकप २०२३ साठी टीम इंडियाची निवड केली आहे. ५ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप २०२३ सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरलाऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अद्याप टीम इंडियाची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याआधी सौरव गांगुली यांनी वर्ल्डकपसाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. (World Cup 2023)
२००३ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या गांगुली यांनी मजबूत बॅटिंग लाइनअपचा निवडला आहे. त्यांनी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि ईशान किशन यांना आघाडीच्या फळीत स्थान दिले आहे. तर मधल्या फळीमध्ये विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना स्थान दिले आहे.
विकेटकीपिंगसाठी संघात त्यांनी इशान किशन आणि केएल राहुल यांना पसंती दिली आहे. संघाला अधिक बळकट बनवण्यासाठी हार्दिक पांड्याला उपकर्णधारपदी नियुक्त केले आहे. हार्दिकसह अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे. गांगुली यांनी फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवचा आपल्या संघात समावेश केला आहे.
सौरव गांगुली यांनी तिलक वर्मा आणि युझवेंद्र चहल याला संघात घेतले नाही. गांगुली यांनी स्टार स्पोर्ट्सला मुलाखत देताना म्हणाले की,
"मधल्या फळीतील कोणताही फलंदाज दुखापत झाल्यास त्याच्या जागी तिलक वर्माला स्थान देण्यात येईल. एखादा वेगवान गोलंदाज जखमी झाला तर प्रसिद्ध कृष्णा आणि फिरकीपटू जखमी झाल्यास युझवेंद्र चहल यांना संघात बदली खेळाडू म्हणून स्थान देण्यात येईल."
वन-डे वर्ल्ड कप २०२३ साठी गांगुली यांचा भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर.
हेही वाचा :