सोलापूर : भाजप आणि सुशीलकुमार व आ. प्रणिती शिंदे यांच्यात काहीतरी शिजतेय. कुठेतरी आग लागल्याशिवाय का धुराचे लोट वर दिसतात. अगदी तसेच आजवर कधीच सुशीलकुमारांविषयी अशी पक्षांतराची चर्चा झाली नाही. मग ती चर्चा अशी एकाएकी का सुरू झाली. तीही भाजपच्या नावानेच का. तसेच हल्लीच्या काळात सोलापुरात भाजप नेत्यांच्या सुशीलकुमारांच्या घरी वाढलेल्या वार्या कशाचे द्योतक आहे. Sushil Kumar Shinde
निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीकडून अन्य पक्षातील बड्या नेत्यांना फोडण्याची मोहीम सुरू होत असते, हा आजवरचा इतिहास आहे. त्याची चाहूल लागावी अशी घटना नुकतीच सोलापुरात घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना व तीन टर्म आमदार असलेल्या त्यांच्या कन्या प्रणिती यांना भाजपने ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट सुशीलकुमारांनी नुकताच अक्कलकोट तालुक्यातील एका हुरडापार्टी कार्यक्रमा दरम्यान केला. यातून राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. Sushil Kumar Shinde
दरम्यान, त्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापुरात भाजप सुपर वॉरिअर बैठकीसाठी आले होते. तेव्हा ते म्हणाले आम्ही शिंदे पितापुत्रीस ऑफर वगैरे दिलेली नाही. परंतु आमच्या पक्षात अन्य पक्षातील जुना जाणता नेता येत असेल व त्यातून आमचा पक्ष वाढत असेल तर आम्ही थोडं ना म्हणणार आहोत.
त्यानंतर लगेचच सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील हे सोलापुरात होणार्या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमंत्रणाची पत्रिका देण्यासाठी सुशीलकुमारांच्या घरी गेले. त्यानंतर त्यांनीही माझी व सुशीलकुमारांची सांस्कृतिक भेट होती. यावेळी राजकीय चर्चा झाली नाही असे सांगितले. पण त्याचबरोबर राजकीय भेट गुप्त असते, ती मीडियाला वर्षानुवर्षे कळतही नाही. आत्ता आमच्या भेटीत सुशीलकुमारांनी नितीन गडकरी यांची आठवण काढली. गडकरी हे मित्र आहेत, असेही सांगितले.
तिकडे दुसर्या बाजूला आ. नितेश राणे आणि आ. गिरीश महाजन यांनी सुशीलकुमार अथवा आ. प्रणिती भाजपमध्ये आल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू, असा उल्लेख मीडियाशी बोलताना केला.
या सार्या घटना घडामोडींवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भाजप आणि सुशीलकुमार व आ. प्रणिती शिंदे यांच्यात काहीतरी शिजतेय. कुठेतरी आग लागल्याशिवाय का धुराचे लोट वर दिसतात. अगदी तसेच आजवर कधीच सुशीलकुमारांविषयी अशी पक्षांतराची चर्चा झाली नाही. मग ती चर्चा अशी एकाएकी का सुरू झाली. तीही भाजपच्या नावानेच का. तसेच हल्लीच्या काळात सोलापुरात भाजप नेत्यांच्या सुशीलकुमारांच्या घरी वाढलेल्या वार्या कशाचे द्योतक आहे. यावरून सुशीलकुमारांच्या मनात नक्कीच काही तरी सुरूय याचा अंदाज येतो.
याशिवाय आणखी एक म्हणजे शुक्रवारी (ता. 19) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात एका कार्यक्रामानिमित्ताने आले होते. यापूर्वीच्या प्रत्येक दौर्यात पंतप्रधान मोदी यांनी सुशीलकुमारांवर टीका केली आहे, त्यांना हसमुखराय म्हणून हिणवले आहे. 'बाप-बेटी'वरून काही टीकाटिप्पणी केली. परंतु यंदाच्या दौर्यात मात्र त्यांनी सुशीलकुमारांविषयी ब्र शब्दही काढला नाही.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमारांनी सोलापूर मतदारसंघासाठी आ. प्रणिती यांचे नाव पुढे करून तयारी सुरू केली आहे. दुसर्या बाजूला भाजपला अद्याप त्या तोडीचा चेहरा सापडलेला नाही.
माजी खा. शरद बनसोडेंविषयी नाराजी असल्याने त्यांना बदलून भाजपचे गत निवडणुकीत महास्वामी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना संधी दिली. परंतु त्यांच्या जातीच्या दाखल्यावरून भाजपला खूप टीका सहन करावी लागली. शिवाय महास्वामींना खासदार म्हणून म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी सोलापूर लोकसभा मतदारसंघात नाराजी निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक चेहरा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे सध्यातरी नाही.
या सर्व घटना-घडामोडींचा सुसंगत विचार केला तर लक्षात येते सोलापूर मतदारसंघ राखण्यासाठी सुशीलकुमार व आ. प्रणिती यांना भाजपने ऑफर दिली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आ. प्रणितींना पुढील काळात राजकीय 'अच्छे दिन' येण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, याची जाणीवही कदाचित शिंदे पिता-पुत्रीस झाली असण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व घटनांचा सुसंगत विचार केला तर असे लक्षात येते की सुशीलकुमार व कन्या आ. प्रणिती शिंदे या सध्यातरी भाजपच्या वाटेवर आहेत.
हेही वाचा