सोलापूर : गॅस सिलिंडरचा स्‍फोट; आगीत जळालेली आईची चिमुकल्‍याला मिठी मृत्‍यूनंतरही कायम | पुढारी

सोलापूर : गॅस सिलिंडरचा स्‍फोट; आगीत जळालेली आईची चिमुकल्‍याला मिठी मृत्‍यूनंतरही कायम

दक्षिण सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ येथे सकाळी स्वयंपाक करीत असताना गॅसचा स्फोट होऊन घरातील आई आणि मुलाचा जागीच भाजून मृत्यू झाला आहे. यामध्ये माणिक म्हाळप्पा धायगुडे (वय 7) शिलवंती म्हाळप्पा धायगुडे (वय 30) मृत पावलेल्या आई आणि मुलाची नावे आहेत. तर पती म्हाळप्पा माणिक धायगुडे (वय 36) हे जखमी झाले आहेत.

गॅसचा स्फोट झाल्याचा आवाज आल्यानंतर पती म्हाळप्पा हे वाचवण्यासाठी धावले असता त्यामध्ये तेही भाजून जखमी झाले. उपचाराकरिता त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी धायगुडे यांच्या घराजवळ एकच गर्दी केली. घटनेचे खबर वळसंग पोलिसांना मिळताच वसंत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगले, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, राजकुमार निंबाळकर, सीआयएसएफचे निरीक्षक संतोष कुमार, वाघ हे घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी तालुका आरोग्य अधिकारी नीलम घोगरे, नायब तहसीलदार भंडारे यांनी भेटी दिल्या. या दुर्दैवी घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आगीच्या दुर्घटनेतही वात्सल्याची प्रचिती

मुलगा अंगणवाडीत शाळेत जात होता. आज सुट्टी असल्यामुळे तो बिछान्यावर झोपला होता. जेव्हा घरात आग भडकली तेव्हा त्याला वाचवण्यासाठी आईने मुलाला मारलेली मिठी जळालेल्या अवस्थेत दिसून आले. हे चित्र खूपच विदारक हृदय पिळवटून टाकणारे होते.

म्हाळप्पाची उपवासाची खिचडी खाणे अर्धवटच राहिली

म्हाळप्पा हे रिक्षा चालक असून, ते व्यवसायासाठी सकाळी सोलापूरला जाणार होते. त्यांचा उपवास असल्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी खिचडी बनवली होती. घटनास्थळी बनवलेले खिचडी आणि अर्धवट राहिलेल्या चपात्या दिसून आल्या.

Back to top button