मलोली; पुढारी वृत्तसेवा : श्री श्री साखर कारखाना लिमिटेड राजेवाडी या कारखान्याची ऊस वाहतूक करणारी वाहने संतप्त शेतकऱ्यांनी मलोली (ता. माळशिरस) येथे अडवली. गेल्या गळीत हंगामात जाहीर केलेला दर जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत या भागातील ऊस वाहतूक करू दिली जाणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने आंदोलनाची ठिणगी पडली आहे.
सविस्तर माहिती अशी, २०२१-२२ या गळीत हंगामासाठी श्री श्री साखर कारखाना लिमिटेड राजेवाडी या कारखान्याने गतवर्षीचा गाळप हंगाम सुरू करण्याअगोदर आपला कारखाना जानेवारीत ऊस गाळपासाठी आला तर २६६० रुपये दर देवू व जानेवारीपासून पुढील कालावधीत प्रत्येक महिन्यास प्रति टन ५० रुपये वाढवून देवू, अशा पद्धतीचे आश्वासन दिले होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. सोमवारी साळमुख चौक येथे शेतकऱ्यांनी बैठक घेतली. यामध्ये कारखान्यास दोन दिवसांत पाठीमागील बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा अल्टीमेट दिला आहे.
यावेळी पंचायत समितीचे गटनेते रणजितसिंह जाधव, राजेंद्र पाटील, नागेश काकडे, आभिमान मिले, बाबुराव उघडे, शिवाजी आवताडे, तुकाराम आवताडे, तानाजी कदम, कैलास काकडे, प्रभाकर इंगळे सरदेशमुख, विशाल चव्हाण, ओंकार काळे, दशरथ वाघमोडे, सुभाष आवताडे, संजय जाधव, राजेंद्र जाधव, संपत पाटील यांच्यासह तांदुळवाडी फळवणी, कोळेगाव, शेंडेचींच, साळमुख व पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी उपस्थीत होते.
हेही वाचा :