सोलापूर : महाराष्ट्राच्या सीमा भागातील २८ गावांत कर्नाटकचा जयजयकार

सोलापूर : महाराष्ट्राच्या सीमा भागातील २८ गावांत कर्नाटकचा जयजयकार
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यापासून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीमावर्ती भाग हा विकासापासून दूर आहे. हा मुद्दा उपस्थित करत तब्बल २८ गावांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर विश्वास दाखवत कर्नाटकात जाण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे सीमावर्ती भागामध्ये कर्नाटक सरकारच्या जयजयकाराचे निनाद घुमू लागले आहेत. कर्नाटकी झेंडेसुद्धा फडफडू लागले असताना लोकप्रतिनिधी मात्र शांत असल्याचे दिसून येत आहे.

रस्ते, पाणी, वीज, शेती अनुदान, नुकसान भरपाई, उजनीचे पाणी, शिक्षण यासह विविध मूलभूत सोयी सुविधा आणि नोकरी हे मुद्दे पुढे करून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींनी कर्नाटकमध्ये सहभागी करून घ्या, असा एकमताने ठराव करून रण पेटवले आहे. यामुळे तडवळसह अक्कलकोट तालुक्यातील २३ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाच गावांमध्ये कर्नाटक सरकारचा जयजयकार करत कर्नाटकचे झेंडे फडफडू लागले आहेत. हा सगळा प्रकार पाहत कर्नाटकचे आजी-माजी लोकप्रतिनिधीसुद्धा कर्नाटकमध्ये समावेश होऊ पाहणाऱ्या लोकांना पाठबळ देत आहेत. शिवाय विकासाचे स्वप्नही दाखवत आहेत.

यामुळे कर्नाटक सीमाप्रश्न दिवसेंदिवस अधिकच गडद आणि तीव्र होत आहे. तडवळ, पानमंगळूर, अंकलगे, करजगी, आळगी, गळोरगी, नागणसूर, तोळणूर यासह २३ गावे आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्नाटक सीमा व भीमा नदीच्या काठावरील गावे कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. कर्नाटक रक्षणा वेदिकेचे जिल्हाध्यक्ष मल्लिनाथ करपे, आदर्श कन्नड बळकचे प्रमुख व कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकाचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, आळगीचे सरपंच महांतेश हत्तुरे हे सीमा भागातील नागरिकांची भेट घेऊन विकासाचे मुद्दे पटवून देत महाराष्ट्र सरकारबद्दल द्वेष पसरवून कर्नाटकमध्ये सामिल होण्यासाठी गळ घालत आहेत. यामुळे येथील नागरिक कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन जयजयकार करत विकास करा, अन्यथा आम्हाला कर्नाटकामध्ये जाऊ द्या, अशी घोषणाबाजी करत आहेत. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी मात्र शांत असल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच्या या मौन भूमिकेवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

निवेदन देण्यासाठी कर्नाटकचे मंत्री येणार!

कर्नाटकातील कॅबिनेट मंत्र्यांना सोलापुरात आमंत्रित करून अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीने केलेले ठराव आणि त्याबरोबर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. याबाबत कर्नाटक रक्षणा वेदिकेचे राज्याध्यक्ष टी. नारायण गौडा यांच्याशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तेथील नेत्यांना निवेदन देण्यासाठी सोलापूरला पाठवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जन्म महाराष्ट्रात झाला आहे. मरण पण महाराष्ट्रातच हवे आहे. मात्र महाराष्ट्र सरकार सीमा भागातील नागरिकांच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याने आम्ही कर्नाटकात जाण्याची भूमिका स्वीकारली आहे.
– सोमशेखर जमशेट्टी, अध्यक्ष, कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटक

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली. अजूनही सीमा भागात विकास झाला नाही. कोणतेच लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. कर्नाटक सरकार तरी आमच्या विकासाला धावून येईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
– मल्लिनाथ करपे, जिल्हाध्यक्ष, कर्नाटका रक्षणा वेदिके, सोलापूर

सीमा भागात रस्ता नाही. चांगल्या शिक्षणाची सोय नाही. यामुळे वाहने येत नाहीत. रस्त्याअभावी शिक्षक, डॉक्टरही येत नाहीत. या सगळ्या बाबीला कंटाळून आम्ही कर्नाटकात जायची तयारी सुरू केली आहे.
– महांतेश हत्तुरे, सरपंच, आळगी, ता. अक्कलकोट

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news