मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'बिग बॉस १३' चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांचे वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृत्यूवेळी अभिनेत्री शहनाज गिल त्याच्याजवळ होती असे बोलले जात आहे. याच दरम्यान सोशल मीडियावरून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यासोबत त्याच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
सिद्धार्थ शुक्ला यांच्या मृतदेहावर ५ डॉक्टरांच्या टीमने नुकतेच पोस्टमॉर्टम करून हा रिपोर्ट पोलिसांना दिला. पंरतु, सिद्धार्थच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान सिद्धार्थच्या अशा अकाली निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
हे वृत्त समजताच बॉलिवूड स्टार्ससोबत अनेक चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यासोबतच काहींनी सिद्धार्थच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे.
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याचे २४ ऑक्टोबर २०१७ रोजीचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या ट्विटमध्ये सिद्धार्थने मृत्यूविषयी मत मांडले आहे. यात त्यांने 'मृत्यू हे जीवनातील सर्वात मोठे नुकसान नाही. तर तुम्ही आतल्याआत मरणे हे सर्वात मोठे नुकसान आहे.' असे म्हटले आहे.
सिद्धार्थ शुक्लाचे हे ट्विट वाचून चाहते भावूक झाले आहेत. यात एका चाहत्याने 'कृपया परत ये सिद्धार्थ.', तर दुसऱ्या एका चाहत्याने 'कृपया आणखी एक ट्विट करण्यास परत ये सिद्धार्थ, परत ये यार.' असे म्हटले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या आईने त्याला पाणी पाजून झोपविले. परंतु, सकाळी तो उठला नाही. यानंतर आईने मुलींना फोन करून बोलावून घेतले. यानंतर सिद्धार्थला मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केले. यात दरम्यान आदल्या रात्री त्याने काही औषधांचा डोस घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहावर ब्रह्मकुमारी पद्धतीनुसार अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. याआधी त्याचे पार्थिव जुहू येथील ब्रह्मा कुमारी येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत त्याच्या कुटुंबातील सदस्यासोबत काही जवळचे नातेवाईक सहभागी झाले आहेत.
हेही वाचलंत का?