नगर पुढारी वृत्तसेवा :
छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह भाष्य करणारा आणि भारतीय जनता पार्टीचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम याला एक वर्षासाठी नगरमधून हद्दपार करण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यासंदर्भात पोलिसांना नुकतेच आदेश दिले.
दरम्यान, छिंदमविरुध्द कोतवाली आणि तोफखाना पोलिस ठाण्यांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अनाधिकाराने मालमत्तेचे नुकसान करणे, धार्मिक भावना दुखविणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.
छिंदम याच्यासह अन्य गुन्हेगारांनाही हद्दपार करण्यात आलं आहे. यामध्ये संदीप भाऊसाहेब घुगे (रा. मालूंजे, ता. संगमनेर), अक्षय सुभाष सोनवणे (वाडेगव्हाण, ता. पारनेर), अविनाश विश्वास जायभाय (रा. दूधसागर सोसायटी, केडगाव, ता. नगर) आदी गुन्हेगारांचा समावेश आहे.