महाविकास आघाडी न झाल्यास शिवसेनेची वाट बिकट

महाविकास आघाडी न झाल्यास शिवसेनेची वाट बिकट
Published on
Updated on

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. मात्र, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे अंतर्गत वाद व स्वतःपुरते पाहण्याच्या मानसिकतेमुळे या निवडणुकीत शिवसेना कितपत प्रभावी ठरणार, याबाबत शंकाच आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी न झाल्यास शिवसेनेसाठी महापालिकेची वाट अतिशय बिकट ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युतीची चर्चा रेंगाळत ठेवली. दरम्यानच्या काळात युती तुटल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने युतीच्या आशेवर असलेल्या शिवसेनेची ऐनवेळी धावपळ झाली. शिवसेनेला सर्व 128 जागांवर उमेदवारही उभे करता आले नाहीत. सेनेने 119 जागा लढवल्या आणि नऊ जागा जिंकल्या. भाजपने पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेतली. भाजपाला 77 राष्ट्रवादीला 36, अपक्षांना पाच तर मनसेला एका जागेवर विजय मिळाला.

मात्र, झालेल्या पराभवापासून शिवसेनेचे नेते काही धडा शिकल्याचे दिसत नाही. अजूनही पक्षांतर्गत कुरबुरी सुरूच आहेत. तत्कालीन संपर्क प्रमुख बाळा कदम यांच्यावरील नाराजीमुळे शिवसेनेतील चार नगरसेवक भाजपच्या वाटेवर होते. यातील तत्कालीन जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व त्यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी भाजपात प्रवेश केला. पक्षाने अधिक पडझड नको म्हणून संपर्क प्रमुखपदी सचिन अहीर तर सहसंपर्क प्रमुखपदी आदित्य शिरोडकर यांची नियुक्ती केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आकुर्डी व भोसरी मेळाव्यात येत्या निवडणुकीत महापौर शिवसेनेचाच होणार, महापालिका निवडणुकीचे निकाल अशाप्रकारे लागावेत की कोणाचे कितीही आकडे आले तरी महापौर शिवसेनेचाच व्हावा. पंचावन्न आमदार असताना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर चाळीस-पंचेचाळीस नगरसेवक निवडून आल्यास आपला महापौर का होऊ शकत नाही, असा सवाल करून शिवसैनिकांचे रक्त तापविण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी पक्षाचे स्थानिक नेते पावले टाकताना दिसत नाहीत. जो तो आपापल्या वार्डापुरते लक्ष ठेवून आहे. स्थानिक नेत्यांच्या पायापुरते पाहण्याच्या मानसिकतेमुळे शिवसेनेची वाट अतिशय बिकट झाली आहे.

शिव संपर्क अभियानांतर्गत शहरात खासदार ओमराजे निंबाळकर व हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत मेळावे झाले. प्रभागनिहाय बैठका झाल्या, त्यास निरीक्षक उपस्थित होते. पक्षसंघटन मजबुतीवर भर दिला जात असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात येते. पूर्वी यादीला गटप्रमुख होता, आता शंभर मतदारांवर एक गटप्रमुख ,कार्यकर्ता नेमण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, हे सारे पदाधिकारी व शिवसैनिकांपुरतेच मर्यादित असल्यासारखे दिसत आहे. पक्षाची प्रसिद्धी यंत्रणा पार ढेपाळली असल्याने पक्षाने घेतलेले चार दोन कार्यक्रमही लोकांपर्यंत जात नाहीत.जनतेचे प्रश्न हाती घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत पक्ष महापालिका निवडणुकीत सामोरे कसा जाणार, असा प्रश्न केला जात आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी न झाल्यास शिवसेनेची वाट अतिशय बिकट आहे.

जास्त जागांची मागणी केल्यास एकला चालोरे…

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस या मित्रपक्षांशी आघाडी व्हावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र, मित्रपक्षांनी ताकदीपेक्षा जास्त जागांची मागणी केल्यास एकला चलो रेची भूमिका घ्यावी लागेल, असे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरीत सांगितले. त्यामुळे आघाडीच्या भरवशावर असलेल्या शिवसेनेला योग्य तो संदेश मिळाल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news