पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रातील श्रद्धाच्या जवळच्या व्यक्तीचा महत्त्वाचा जबाब नोंदवला आहे. या केसप्रकरणी यामध्ये मृत श्रद्धा वालकर हिचा मित्र लक्ष्मण नादर याचा दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन जबाब नोंदवला आहे. दिल्ली पोलिस घेत असलेले जबाब आणि पुराव्यांवरून श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिचा लिव्ह इन मध्ये राहणारा मित्र आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवड्यांत टप्प्याटप्याने त्याने मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील जंगलात टाकत, त्याची विल्हेवाट लावली. या प्रकरणी दिल्ली पोलीसांकडून संबंधित तपास सुरु आहे. यामध्ये दररोज वेगळी माहिती हाताला लागत असून, या दोघांचे जन्मठिकाणी असलेल्या परिसरात दिल्ली पोलीस सध्या शोध घेत आहेत.
या केसप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पीडितेच्या महाराष्ट्रातील जवळच्या मित्राचा जबाब नोंदवला आहे. या केसप्रकरणी तपासासाठी दिल्ली पोलिसांची टिम महाराष्ट्रातील वसईमध्ये (जि. पालघर) शुक्रवारी (दि.१८) दाखल होत त्यांनी हा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणी जबाब नोंदवण्यात आलेला श्रद्धाचा मित्र लक्ष्मण हा २०१९ पासून श्रद्धाच्या संपर्कात आहे. याप्रकरणी श्रद्धा काम करत असलेल्या कॉल सेंटरच्या मॅनेंजरची पोलीसांकडून माहिती काढण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास ४ ते ५ तास श्रद्धाचा मित्र लक्ष्मण याचा जबाब नोंदवण्यात आला. शिवाय दिल्लीला राहयला जाण्यापूर्वी श्रद्धा आणि आफताब भाड्याने राहत असलेल्या घर मालकाचाही दिल्ली पोलिसांच्या टिमने जबाब नोंदवला आहे.
या केसप्रकरणी मनिकपूर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना गरजेची असलेली माहिती पुरविण्याचे अश्वासन दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांची टीम मनिकपूर पोलिसांच्या मदतीने आफताबच्या कुटुंबाचा शोध घेत आहे. तपासादरम्यान संपर्क सांधण्याचा प्रयत्न केला असता, आफताब याच्या वडिलांचा मोबाईलही बंद येत आहे. त्याच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारे संपर्क झालेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.