नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते अर्जुन खोतकर येत्या ३१ जुलैला सिल्लोडमध्ये आयोजित भव्य मेळाव्यातून शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा शुक्रवारी अब्दुल सत्तार यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मुक्कामी असलेल्या खोतकरांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित करण्यासाठी सत्तार यांनी त्यांची भेट घेत मनधरणी केल्याची माहिती समोर आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी खोतकर यांच्यासह सत्ताधारांनी त्यांची भेट घेत चर्चा केली.
खोतकर आणि त्यांच्या जवळच्या मित्र परिवारासोबत गुरुवारी रात्री बैठक घेत चर्चा केली असून त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असल्याची माहिती सत्तार यांनी दिली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतरच एकनाथ शिंदे गटात जायचे की नाही? याचा निर्णय घेऊ अशी सावध प्रतिक्रिया खोतकरांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात आयोजित भव्य मेळाव्यात मुख्यमंत्री हजेरी लावतील. याच कार्यक्रमात खोतकर शिंदे गटात सामिल होणार असल्याचे बोलले जात आहे.
राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात राजकीय दिलजमाई झाली आहे. दरम्यान 'मी अजून शिवसेनेत आहे की नाही, याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे, तो मी घेणार आहे. एकनाथ शिंदे यांची सहज भेट घेतली होती. मदारसंघात गेल्यानंतर भूमिका स्पष्ट करू, असे खोतकर यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले होते.
'दानवे यांच्या सोबत ४० वर्षांपासून मैत्री आहे. वेगवेगळ्या पक्षात असलो तर आम्हची चांगली मैत्री आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने मला चहा पिण्यासाठी बोलावले होते, त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आलो होता, अशी प्रतिक्रिया खोतकरांनी याआधी दिल्लीत दिली केली.
हे ही वाचा :