रावसाहेब दानवे-अर्जुन खोतकर यांच्यामध्ये 'ब्रेक्सफास्ट डिप्लोमसी' | पुढारी

रावसाहेब दानवे-अर्जुन खोतकर यांच्यामध्ये 'ब्रेक्सफास्ट डिप्लोमसी'

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात राजकीय दिलजमाई झाल्यानंतर आज, मंगळवारी दानवे यांच्या निवासस्थानी जाऊन खोतकरांनी त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना साखर भरवून राजकीय वैर संपुष्टात आणल्याचे कळतेय. १ तास झालेल्या या ‘ब्रेक्सफास्ट डिप्लोमसीत’ राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ‘मी अजून शिवसेनेत आहे की नाही, याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे, तो मी घेणार आहे. एकनाथ शिंदे यांची सहज भेट घेतली होती. मदारसंघात गेल्यानंतर भूमिका स्पष्ट करू, असे खोतकर यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.

‘दानवे यांच्या सोबत ४० वर्षांपासून मैत्री आहे. वेगवेगळ्या पक्षात असलो तर आम्हची चांगली मैत्री आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने मला चहा पिण्यासाठी बोलावले होते, त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आलो होता, अशी प्रतिक्रिया खोतकरांनी व्यक्त केली. शिंदे गटात जाणार या अफवा आहेत. आपण अजून ही शिवसेनेत असून फोटोवरून अंदाज बांधू नका, असे देखील खोतकरांनी स्पष्ट केले. संकटांमुळे चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो. संकट असेल तर कोणाही व्यक्ती सुरक्षित होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच. माझ्या चेहऱ्यावर तणाव का आहे? याची कारण सर्वांनी माहित असल्याचे यावेळी खोतकर म्हणाले.

दरम्यान, राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो, क्षणिक काही गोष्टी घडत असतात आणि मतभेद होत असतात. राज्यात सरकार नसताना आम्ही जालन्यात बँकेत ४० वर्ष सत्तेत ठेवली होती. एकनाथ शिंदे यांची सोमवारी भेट झाली होती. खोतकर हे शिवसेनेमध्येच आहे त्यांनी सुद्धा सांगितले आहे आणि शिवसेना आमच्यासोबत आहे. हा शिंदे गट नसून मुळ शिवसेना आहे, २०१९ मध्ये शिवसेना सोडून गेली होती, त्यानंतर आता खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया भेटीनंतर दानवेंनी दिली.

Back to top button