शशिकांत शिंदे : ‘शिवेंद्रराजे कोणत्या पक्षात आहेत हे जिल्ह्याच्या नेत्यांनी सांगावे’

शशिकांत शिंदे : ‘शिवेंद्रराजे कोणत्या पक्षात आहेत हे जिल्ह्याच्या नेत्यांनी सांगावे’

Published on

शिवेंद्रराजे हे कोणत्या पक्षातले आहेत हे जिल्ह्यातल्या नेत्यांनी सांगावे. ज्ञानदेव रांजणे हे छोटे कार्यकर्ते आहेत. त्यांचा 'बोलविता धनी' वेगळा आहे. जिल्ह्यात मी राष्ट्रवादी पक्ष वाढवत असल्यानं अनेकांना माझा अडसर आहे हे मला माहीत आहे, असं म्हणत, आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. 'पक्षासाठी मी कुणालाही अंगावर घेतो हा माझा दोष आहे. जावलीची जनता कोणाच्या मागे आहेत हे कळेलच. शिवेंद्रराजे भोसले कोणत्या पक्षात आहेत हे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मला एकदा सांगावं, म्हणजे पुढच्या काळात कोणत्या तालुक्यात पक्ष कसा वाढवायचा हे ठरवता येईल,' असा इशाराही शिंदे यांनी दिला.

जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. 'माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादीअंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. मात्र, पक्षाचेच बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्यामुळं त्यांना एका मतानं पराभव पत्करावा लागला. त्यामुळं संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिंदे यांना मदत झाली नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. शशिकांत शिंदे यांनी मात्र ही सगळी चर्चा फेटाळून लावली. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांमुळंच माझी राजकीय ओळख आहे. कालच्या निवडणुकीत स्वत: शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी माझ्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही गोष्टी वेगळ्या घडल्या. आम्ही गाफील राहिलो, त्याचा फटका बसला,' असं शिंदे म्हणाले.

'कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चुकीचं कृत्य झालं आहे. त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व नेत्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असंही शिंदे म्हणाले.

'शरद पवारांसाठी मी जीव देईन'

'मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार साहेबांना माहीत आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन. त्यामुळं कार्यकर्त्यांनी कुठलीही चुकीची भूमिका घेऊ नये, असं आवाहन शिंदे यांनी केलं. 'अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत माझं नाव निश्चित झालं होतं. मतदारांचा आकडाही मी समोर ठेवला होता. रामराजे निंबाळकर हे देखील बैठकीला होते. त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले, पण ते किती प्रामाणिक होते माहीत नाही. माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान आहे. येत्या काळात ते समोर येईलच,' असंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागं काय काय घडलं? यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांची 'पुढारी'चे वृत्तसंपादक हरिष पाटणे यांनी घेतलेली Exclusive मुलाखत…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news