Pune News : शरद पवार, अजित पवार एकाच व्यासपीठावर; व्हीएसआय संचालक मंडळाची आज पुण्यात बैठक

Pune News : शरद पवार, अजित पवार एकाच व्यासपीठावर; व्हीएसआय संचालक मंडळाची आज पुण्यात बैठक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) संचालक मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार आणि संस्थेचे संचालक व उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि संचालक मंडळाचे अन्य सदस्य हे शुक्रवारी (दि. 15) उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सत्तांत्तरानंतर प्रथमच दोन्ही पवार सकाळी साडेदहा वाजता होणार्‍या बैठकीच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

संबंधित बातम्या : 

व्हीएसआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि साखर सह संचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या 'इक्षुदंड ते इथेनॉल – साखर उद्योगाची भरारी' या पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आले. व्हीएसआयची दर तीन महिन्यांनी बैठक होत असते.

व्हीएसआयमध्ये मध्यंतरी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखानदारांसाठी एक कार्यशाळा 12 ऑगस्ट रोजी झाली होती. त्या वेळी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील एका व्यासपीठावर आले होते. तर द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते वाकड येथे 27 ऑगस्ट रोजी झाले आणि दुसर्‍या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती. परंतु ते राज्यातील सत्ता बदलानंतर एकत्र आलेले नाहीत.

आता व्हीएसआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने प्रथमच दोन्ही पवार एकत्र येणार आहेत. व्हीएसआयचे संचालक मंडळ सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, भाजपचे हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, बबनराव शिंदे, रोहित पवार, विशाल पाटील, इंद्रजित मोहिते व अन्य मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. व्हीएसआयमधील बैठक ही नियमित असली, तरी राज्यातील सत्तांत्तरानंतर सर्वच पक्षांतील संचालक एकत्र येण्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news