‘गोकुळ’ची आजची सभा गाजणार | पुढारी

‘गोकुळ’ची आजची सभा गाजणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गोकुळ दूध संघाची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 15) होत असून, सभेच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सत्ताधार्‍यांच्या कारभारावर हल्लाबोल केल्यामुळे सभा गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभा सुरळीत पार पाडण्यासाठी सत्ताधार्‍यांच्या वतीने तयारी करण्यात आली असली, तरी विरोधकांनीही आपल्या तोफा तयार ठेवल्या आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’च्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

गतवर्षी सभेच्या ठिकाणाचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी वातावरण तापविले होते. यावर्षी ‘गोकुळ’ने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना परिसरातच सर्वसाधारण सभा ठेवली आहे. अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’चा कारभार चांगला चालला आहे, हे सांगत सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. सभेच्या पूर्वसंध्येलाच संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधार्‍यांच्या कारभारावर हल्लाबोल करत कारभार सुधारा; अन्यथा ‘गोकुळ’चा शेतकरी संघ होईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सभेच्या निमित्ताने वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.

दरम्यान, तयारी पूर्ण झाली असून, सभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पाच हजार खुर्च्या लावण्यात आल्या असून, महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. बाजूलाच पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच 75 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

Back to top button