पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानच्या 'जवान' या आगामी चित्रपटाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. (Jawan ) निर्मात्यांनी शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली असल्याची माहिती समोर आली आहे. (Jawan )
एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 'जवान' हा चित्रपट २ जून, २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे. चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट पूर्ण करण्यासाठी निर्मात्यांना आणखी वेळ लागेल, असे या वृत्तात सांगण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट आणखी चांगला बनू शकतो. हा चित्रपट २९ जून किंवा ऑगस्टला प्रदर्शित होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
हा चित्रपट वेगळा आणि उत्तम व्हावा, यासाठी निर्माते असे करत असल्याची माहिती समोर येतेय. या कारणास्तव दिग्गज साऊथ दिग्दर्शक अॅटली यांच्या 'जवान'च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
'जवान'च्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याची बातमी समोर आल्यानंतर आता शाहरुख खानच्या या चित्रपटासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, लवकरच 'जवान'ची नवी रिलीज डेटही निर्मात्यांनी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. जूननंतर 'जवान' ऑगस्टमध्ये रिलीज होऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती आणि अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत.