बुद्ध पौर्णिमा विशेष : कोल्हापुरात बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणांची विविधता! | पुढारी

बुद्ध पौर्णिमा विशेष : कोल्हापुरात बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणांची विविधता!

कोल्हापूर; सागर यादव :  ब्रह्यपुरी टेकडीच्या उत्खननात सापडलेल्या बौद्ध धर्माशी संबंधित विविध वस्तू, जयंती नाला परिसरातील खाराळा परिसरात सापडलेले बौद्ध स्तुपांचे अवशेष, पांडवदरा व पोहाळे येथील बुद्धकालीन लेणी आणि भुदरगड किल्ल्याच्या तटबंदीच्या पायथ्याला असणारा संपूर्ण दगडी बुद्ध विहार या व अशा ऐतिहासिक पाऊलखुणांची विविधता कोल्हापूर परिसरात पाहायला मिळते.

भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाच्या साक्षीदार असणार्‍या या अवशेषांचे सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय संपत्ती म्हणून जतन-संवर्धन होणे गरजेचे आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध लेण्यांचे संशोधन करून त्यांचे जतन-संवर्धन व्हावे आणि त्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणे गरजेचे आहे.

 ब्रह्यपुरी  टेकडी परिसरातील अवशेष

1945-46 च्या सुमारास कोल्हापूर संस्थानचा पुरातत्त्व विभाग आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने पंचगंगा नदीकाठी असणार्‍या ब्रह्यपुरी टेकडी परिसरात उत्खनन करण्यात आले. त्यावेळी जैन, हिंदू धर्मांबरोबरच बौद्ध धर्मासंदर्भातील अनेक वस्तू या उत्खननात सापडल्या होत्या.

 बौद्ध स्तुपाचे अवशेष

 27 ऑक्टोबर 1877 रोजी जयंती नाल्याजवळील खाराळा बागेतील टेकडी परिसरात बंगल्याच्या दुरुस्तीसाठी सुरू असणार्‍या खोदाईवेळी जांभ्या दगडाची पेटी सापडली. दगडी पेटीतील अष्टकोनी पेटीत स्फटिकाची छोटी पेटी होती. खोदाई सुरू असताना या डबीची मोडतोड झाल्याने त्यातील अस्थी इतरत्र विखुरल्या होत्या. दगडी पेटीवर कोरलेल्या ब—ाह्मी भाषेतील अक्षरांवरून पेटीतील रक्षा गौतम बुद्धांच्या असल्याची माहिती दि रॉयल एशियाटिक सोसायटीने दिली. याशिवाय पंचगंगा नदीवर शिवाजी पूल बांधणीचे काम सुरू असताना 22 नोव्हेंबर 1877 रोजी जमिनीपासून 6 फूट खोलीवर एक तांब्याचे भांडे सापडले. भांड्यात काही शिशाची आणि तांब्याची नाणी, निरनिराळी धातूंची भांडी, सोन्याचे मणी व दागिने आणि बौद्ध धर्मीयांच्या नित्याच्या पूजेतील वस्तू होत्या.

पोहाळे व पांडवदरा लेणी

 कुशिरे (ता. पन्हाळा) परिसरात पोहाळ्याची लेणी आहेत. त्यांना पांडवकालीन गुंफा म्हणूनही ओळखले जाते. इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात कोरलेल्या या गुंफा बौद्ध भिक्षुकांच्या साधनेचे स्थळ होते. गुंफात एक चैत्यगृह आणि चार विहार आहेत. स्तुपासमोर एक पीठ असून त्यावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. याच्या बाजूला तब्बल 18 लहान लहान खोल्या आहेत. पन्हागडाजवळील विस्तीर्ण मसाई पठारावर असणार्‍या मसाई देवी मंदिराच्या पश्चिमेला डोंगराच्या खोबणीत पांडवदरा नावाच्या प्राचीन गुहा आहेत. या गुहा सम—ाट अशोककालीन बौद्ध गुंफा असल्याने येथे बुद्ध जयंती साजरी केली जाते.

भुदरगडाजवळील दगडी बुद्ध विहार

 भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी अखंड दगडातील खोली म्हणजे बुद्ध विहार असल्याचे संशोधन बुद्ध जीवन आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी केले आहे. या दगडी बुद्ध विहाराला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे. हे महत्त्वपूर्ण संशोधन असल्याचा निर्वाळा निवृत्त माहिती संचालक व आर्किऑलॉजी विषयातील तज्ज्ञ बी. एम. कौशल यांनी दिला आहे.

Back to top button