पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीदरम्यान वाढत चाललेली संदिग्धता, सकारात्मक जागतिक संकेतांचा अभाव, कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या दबावामुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी (दि.९) गडगडला. सलग पाचव्या सत्रात बाजारात घसरण कायम राहिली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) तब्बल सुमारे १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० (Nifty) निर्देशांक ३५० हून अधिक अंकांनी घसरून २२ हजारांच्या खाली आला. निफ्टी १९ एप्रिलनंतर २२ हजारांच्या खाली येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, सेन्सेक्स १,०६२ अंकांच्या घसरणीसह ७२,४०४ वर बंद झाला. तर निफ्टी ३४५ अंकांनी घसरून २१,९५७ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची घसरण अनुक्रमे १.४५ टक्के आणि १.५५ टक्के अशी होती.
बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ७.०१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे ९ मे रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३९३.६८ लाख कोटींपर्यंत खाली घसरले. ८ मे रोजी बाजार भांडवल ४००.६९ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाचे ७.०१ लाख कोटींचे नुकसान झाले.
सेन्सेक्स आज ७३,४९९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,४०० च्या खाली आला. एलटी, एशियन पेंट्स, आयटीसी, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर टाटा मोटर्स, एम अँड एम, एसबीआय, एचसीएल टेक, इन्फोसिस या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
निफ्टी ५० वर एलटी, एशियन पेंट्स, कोल इंडिया, बीपीसीएल, ओएनजीसी हे शेअर्स टॉप लूजर्स होते. हे शेअर्स ३ ते ६ टक्क्यांपर्यंत घसरले. तर हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, टाटा मोटर्स, एसबीआय, एचसीएल टेक हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाचे आतापर्यंत तीन टप्पे पार पडले आहेत. एकूण निवडणुकीपूर्वीचा उत्साह कमी झाला आहे. लोकसभा निवडणूक निकालांची तारीख जसजशी जवळ येईल तशी बाजारातील संदिग्धता वाढणार असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत.
आजच्या ट्रेडिंग सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो (L&T) हे हेविवेट शेअर्स घसरले. सेन्सेक्सवर एल अँड टी शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स जवळपास ६ टक्क्यांनी घसरून ३,२७७ रुपयांवर आला. रिलायन्सचा शेअर्स १.५ टक्क्यांनी घसरून २,८०० रुपयांच्या खाली आला. एचडीएफसी बँक, आयटीसी शेअर्समधील विक्रीचाही बाजारावर दबाव राहिला. एचडीएफसी बँकचा शेअर्स १.६ टक्के घसरणीसह १,४५६ रुपयांवर आला. निफ्टी बँक ३०० अंकांनी खाली आला. तर निफ्टी एफएमसीजी निर्देशांकाचे सुमारे १,३०० अंकांचे नुकसान झाले.
परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात विक्रीवर जोर राहिला आहे. यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. NSE च्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी निव्वळ आधारावर ६६६९.१० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ५९२८.८१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यातील गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांत १५,८६३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) यंदाच्या २०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत फायनान्सियल स्टॉक्समधील सुमारे ४६ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.
आशियाई बाजारांतील दक्षिण कोरियाच्या कोस्पी वगळता सर्व प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार केला. अमेरिकेच्या बाजारात बुधवारी संमिश्र स्थिती राहिली होती.
हे ही वाचा :