पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट सीएए) लागू झाला आहे. केंद्र सरकारने सोमवारी सायंकाळी याबाबतची अधिसूचना जारी केली. नव्या कायद्याला देशात काही राज्यात विरोधही सुरू झाला आहे. मात्र यासोबतच पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरने या कायद्याबद्ल सरकारचे आभार मानत कुटुंबासोबत आनंद साजरा केला आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सीमा हैदरने 'सीएए' च्या अंमलबजावणीचा आनंद साजरा करत रसगुल्ल्याचे वाटप केले. हैदर आणि तिच्या कुटुंबीयांनी तिरंगा ध्वज, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर हातात घेऊन 'जय श्री राम' आणि 'राधे-राधे'च्या घोषणा दिल्या. "आज सरकारने आपल्या देशात सीएए लागू केला आहे. याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. त्याबद्दल भारत सरकारचे खूप खूप अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे वचन दिले होते ते पूर्ण केले," अशी प्रतिक्रिया तिने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.
"मलाही लवकरच नागरिकत्व मिळेल अशी आशा आहे. यासाठी मी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारची ऋणी राहीन, असं सीमा हैदरने म्हटलं आहे." यावेळी सीमा, तिची मुले आणि सचिनच्या कुटुंबीयांनी 'योगी, मोदी की जय'च्या घोषणा दिल्या.
पश्चिम बंगाल आणि केरळ सरकारने सीएएला विरोध केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनी नुकतेच नियम पाहिले आहेत, नियम पाहूनच काही सांगितले जाईल. मात्र, धर्म, जात, भाषेच्या आधारावर भेदभाव केला जात असेल तर तो आम्ही मान्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नव्या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या मुस्लिमबहुल देशांतील पीडित आणि छळग्रस्त हिंदू तसेच शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या त्या त्या देशांतील धार्मिक अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या निर्णयावर मोदी सरकारने सोमवारी शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा :