Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, मेतेई समुदायाचे क्वाथा खुनौ गाव पेटवले! | पुढारी

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, मेतेई समुदायाचे क्वाथा खुनौ गाव पेटवले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या 10 महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान एक मोठी घटना समोर आली आहे. तेंगनौपाल जिल्ह्यातील मेतेई समुदायाच्या लोकांचे वास्तव्य असलेले क्वाथा खुनौ हे गाव अज्ञातांनी पेटवून दिले आहे. आगीमुळे घरे आणि उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे. क्वाथा खुनौ हे एकमेव गाव होते जे 10 महिन्यांच्या प्रदीर्घ संघर्षापासून संरक्षित होते. मात्र येथील वस्तीला बदमाशांनी आग लावल्यानंतर ते हिंसाचाराला बळी पडले आहे.

मणिपूरमधील अशांततेच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांना क्वाथा खुनौ गावातील गावक-यांनी धैर्याने तोंड दिले. ज्यामुळे या गावाला एक अद्वितीय स्थान प्राप्त झाले होते. मात्र बदमाशांनी गावात जाळपोळ केल्याने येथील शांतता भंग पावली आहे. गावाला आग लावण्याच्या हेतुपुरस्सर कृत्याने केवळ नुकसानच झालेले नाही तर मेतेई समुदायाच्या मनोधैर्यालाही मोठा धक्का बसला आहे. यामुळे येथील लोकांना त्यांच्या भवितव्याबद्दल शंका निर्माण झाली आहे. तसेच आपले पवित्र स्थान क्वाथा खुनौ गाव गमावल्याबद्दल ते निराशा झाले आहेत.

आगीमुळे किती प्रमाणात नुकसान झाले याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि क्वाथा खुनौ गावातील बाधित रहिवाशांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे विविध स्तरातून संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि पीडित गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जलद कारवाईची मागणी केली जात आहे.

Back to top button