सातारा : पुढारी वृत्तसेवा
मुंबई येथे सोमवारी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत राज्यातील 12 राखीव संर्वधन क्षेत्राला मान्यता मिळाली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दरे खु. महादरे फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता मिळालेली आहे. फुलपाखरांचे संवर्धन होणारे हे भारतील पहिलेच क्षेत्र आहे. पश्चिम घाटात आढळणार्या 341 पैकी 178 प्रजातींचा अधिवास आहे. या क्षेत्राला अधिकृत दर्जा मिळाल्याने या ठिकाणी फुलपाखरांच्या प्रजाती वाढण्याबरोबरच पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
2017 पासून महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुक्त संशोधक दरे (खु.) महादरे येथील जंगल परिसरात जैवविविधतेचा अभ्यास करत होते. या टीमने तब्बल पाच वर्षे अभ्यास केल्यानंतर या टीमला विविध जातीच्या फुलपाखरांचा अधिवास असल्याचे आढळून आले. यामध्ये पश्चिम घाटातील दुर्मीळ समजल्या जाणार्या फुलपाखरांचा यात समावेश होता.
महादरे येथे 105 हेक्टर व परिसरात पसरलेल्या जंगलामध्ये एकूण 467 प्रकारच्या वनस्पती प्रजाती आढळून आल्या आहेत. यातील बर्याचशा प्रदेशानिष्ठ, दुर्मीळ व औषधी वनस्पती आहेत. तर सुमारे 47 रानभाज्यांची नोंद करण्यात आली. सस्तन वन्यप्राण्यांच्या 20 प्रजाती, पक्ष्यांच्या 118 प्रजाती, सरपटणारे-उभयचर 16 प्रजाती, मासे 22 प्रजाती, सहस्रपाद 3 प्रजाती, पतंग 80 प्रजाती, कोळी 110 प्रजातीही आढळून आल्या आहेत. फुलपाखरांच्या सर्वात जास्त म्हणजेच एकूण पश्चिम घाटात आढळणार्या 341 प्रजातींपैकी 178 प्रजाती या एकट्या महादरेमध्ये आढळून आल्या आहेत.
महादरे परिसरापासून पश्चिम घाट अथवा मैदानी प्रदेशाकडे जोडणारे सांधणारे प्रदेश कालौघात नष्ट झाले अथवा त्यामधील अंतर वाढत गेले आहे. त्यामुळे या परिसरातील वन्यजीवांच्या वनस्पतींच्या या जैवविविधतेस एकवटलेली अथवा एकाच जागी विकसित होत टिकून राहिलेली जैवविविधता (ट्रॅपड पॉपुलेशन) तयार झाली. या ठिकाणाचे संवर्धन होणे महत्त्वाचे होते. त्यामुळे याचे संवर्धन होणे गरजेचे होते. अभ्यास झाल्यानंतर महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने वन विभागामार्फत राज्य सरकारला हा प्रस्ताव सादर केला. अखेर या प्रस्तावाला सरकारने मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणाचा विकास होण्यास मदत मिळणार आहे. यानिमित्ताने महादरेच्या रूपात भारतातील पहिल्यावहिले फुलपाखरू संवर्धन राखीव केंद्र अस्तित्वात आले. मागील अनेक पिढ्यांपासून जपलेला हा निसर्ग वारसा या माध्यमातून पुढील पिढ्यांसाठी जतन करता आला. या माध्यमातून मेरी संस्थेच्या नवं संशोधकांनी समाजासमोर एक मार्गदर्शक तत्त्व, आदर्श घालून दिला आहे.
महादरेच्या जंगलात क्रिमसन रोज, मलाबर बँडेड पिकॉक, तमिळ स्पॉटेड फ्लॅट, सदर्न बर्डविंग ही प्रदेशानिष्ठ (एंडेमिक) फुलपाखरे, भारतातील आकाराने सर्वात छोटे स्मॉल ग्रास ज्वेल तर सर्वात मोठे सदर्न बर्डविंग हे फुलपाखरू, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन, अनुसूची 1 मधील अर्थात वाघाच्या बरोबरीने संरक्षण असणारी ऑर्किड टिट व व्हाईट टीपड लाईन ब्लू ही अतिशय दुर्मीळ व वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरे या ठिकाणी आढळून येतात.
आम्ही केलेल्या संशोधनाला राजमान्यता मिळाली आहे. भारतातील पहिलेच फुलपाखरू संवर्धन क्षेत्र सातार्यात आहे याचा अभिमान आहे. यामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे. यामध्ये वन विभागातील अधिकार्यांनी मोलाचे सहकार्य लाभले.
– सुनील भोईटे
मानद वन्यजीव रक्षक