सातारा : तीन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; दोन युवक जागीच ठार | पुढारी

सातारा : तीन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; दोन युवक जागीच ठार

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर शहरापासून अंदाजे एक किमी अंतरावर महाड रस्त्यावर हॉटेल अप्सरा ते महाड नाका परिसरातील अवघड वळणावर तीन दुचाकींची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले, तर दोन युवक जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वरकडून महाडच्या दिशेने हिरो डिलक्स एम एच १३ सीआर ७१९३ ही दुचाकी भरधाव वेगात विरुद्ध दिशेने निघाली होती. या दुचाकीची धडक समोरून येणाऱ्या स्प्लेंडर मोटर सायकल क्रं. एमएच १२ सीडब्यू २७६७ व एम एच ११ सी आर ३७४४ या दुचाकींशी झाली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात जुबेर मुस्तफा मानकर (रा. नगरपालिका सोसा., महाबळेश्वर), आकाश तानाजी भोसले (रा. मंगळवेढा, ता. पंढरपूर, जि. सोलापूर‌‌) या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर अमिन बिस्मिल्ला शेख (रा. महाबळेश्वर) व दरिबा सुनिल बळवंतराय उर्फ गोट्या (रा. मंगळवेढा) हे दोघे जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर येथील बेल एअर संचालित ग्रामीण रूग्‍णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघाताची खबर रमिज खाजा वारुणकर (रा. महाबळेश्वर) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली. या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी हिरो डिलक्स एम एच १३ सीआर ७१९३ चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पो नी संदीप भागवत करीत आहेत.

महाबळेश्वर मधील जुबेर मुस्तफा मानकर या युवकाचा दोनच महिन्यांपूर्वी निकाह झाला होता. मनमिळाऊ, सुस्वभावी असलेल्या या तरुणावर काळाने घाला घातल्याने मित्रपरिसरासह कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, तर आकाश तानाजी भोसले (रा.  मंगळवेढा, ता. पंढरपूर, जि. सोलापूर‌‌) हा मित्रांसोबत महाबळेश्वर पर्यटनास आल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचलंत का? 

Back to top button