‘अल्झायमर’मध्‍ये मेंदूच्या पेशी कशा मरतात? शास्त्रज्ञांनी शोधले उत्तर!

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अल्झायमर Alzheimer (स्मृतिभ्रंश) या आजाराची वाढती रुग्‍णसंख्‍या चिंता निर्माण करणारी आहे. आता या विकारात मेंदूच्‍या पेशी कशा मरतात?, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्‍यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. नवीन संशोधनाची माहिती 'जर्नल सायन्स' मध्‍ये प्रकाशित करण्‍यात आली आहे.

अल्‍झायमरवर झालेल्‍या नवीन संशोधनाबाबत 'बीबीसी'शी बोलताना इंग्‍लंडमधील डिमेंशिया रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ बार्ट डी स्ट्रोपर यांनी सांगितले की, "हा एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे. प्रथमच अल्झायमर रोगात न्यूरॉन्स कसे आणि का मरतात, याचे संकेत मिळाले आहेत. मागील ३० ते ४० वर्षांपासून याबाबत बरेच अनुमान लावले जात होते. मात्र याची पुष्‍टी करण्‍यात यश आले नव्‍हते.

Alzheimer : संशोधनात काय आढळले ?

इंग्‍लंडमधील डिमेंशिया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि बेल्जियममधील केयू ल्युवेन येथील संशोधकांनी नमूद केले आहे की, न्यूरॉन्समधील मोकळ्या जागेत असामान्य अमायलोइड तयार होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे मेंदूचा दाह होतो, जो न्यूरॉन्सना आवडत नाही. यामुळे त्यांची अंतर्गत रसायने बदलू लागते. मेंदूच्या पेशी विशिष्ट रेणू तयार करू लागतात. याला MEG3 म्हणतात. या नेक्रोप्टोसिसमुळे मेंदूच्या पेशींचा मृत्यू होतो.

Alzheimers.org ने प्रकाशित केलेल्‍या माहितीनुसार, "अमायलोइड (Amyloid) हे एक असामान्य प्रोटीन आहे. ते मेंदूमध्‍ये आढळते; परंतु अल्झायमर रोगामध्ये अमायलॉइड एकत्र चिकटून राहतात आणि वेगवेगळ्या आकाराचे गुठळ्या तयार करतात. काही काळानंतर त्‍या मेंदूला हानी पोहोचवतात. Tau प्रथिनामुळे टाओओपॅथीमध्ये न्यूरोफिब्रिलरी टँगल्स म्हणून जमा होते."

इंग्‍लंडमधील अल्झायमर रिसर्च संस्‍थेतील डॉ सुसान कोल्हास यांनी म्‍हटलं आहे की, नवीन संशोधनातील निष्कर्ष प्रभावी आहेत; परंतु अद्याप सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. हा शोध महत्त्वाचा आहे कारण तो अल्झायमर आजारातील पेशींच्या मृत्यूच्या नवीन यंत्रणेकडे निर्देश करतो.  ज्या आम्हाला पूर्वी समजत नव्हत्या आणि भविष्यात नवीन उपचारांची दिशा मिळण्‍यास या संशोधनाचा उपयोग होणार आहे.

मेंदूमधून अमायलोइड काढून टाकणारी औषधे विकसित करण्यात अलीकडे यश आले आहे. ते मेंदूच्या पेशींचा नाश कमी करण्यास मदत करतात. अल्झायमरसाठी ही नवीन औषधे टर्निंग पॉइंट म्हणून ओळखली जातात. याबाबत प्रोफेसर डी स्ट्रोपर म्हणतात की, MEG3 रेणू अवरोधित केल्याने मेंदूच्या पेशींचा मृत्यू थांबू शकतो.  अल्झायमरवरील नवीन संशाेधनामुळे या आजारावरील औषधांची  संपूर्ण नवीन श्रेणी होऊ शकते. मात्र यासाठी अनेक वर्षे संशोधन करावे लागेल.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news