![शिष्यवृत्ती योजना : राज्यातील अनुसूचित जातीचे विद्यार्थी होणार उच्चशिक्षित](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2Fdownload-6-6.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी देशातील एआयआयएमएस, आयआयएम, एनआयटी, आयआयआयटी, आयआयएससी, आयआयएसइआर या शैक्षणिक संस्थांसह केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाजकल्याण विभागाकडून राबविली जात आहे.
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या/नवबौद्ध घटकातील १०० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विभागांतील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. या योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ≥≥ जलद दुवे ≥≥ रोजगार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली आहे.
दरम्यान, अधिकृत संकेतस्थळावरून विहित अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो परिपूर्ण भरून कागदपत्रांसह १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६:१५ पर्यंत आयुक्त, समाजकल्याण, पुणे येथे सादर करावा. पदवी /पदव्युतर पदवी/ पदव्युतर पदविका पूर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्याचे समाजकल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले.
हे मिळणार लाभ
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ/शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येते. वसतिगृह व भोजन शुल्क याचाही संस्था आकारणीनुसार खर्च देणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार, असे रुपये १० हजार दोन टप्प्यांत अदा केले जाणार आहेत.
हेही वाचा :