मायावतींचे ‘एकला चलो रे!’ | पुढारी

मायावतींचे ‘एकला चलो रे!’

– अमित शुक्ल

एकेकाळी देशाच्या पंतप्रधानपदाच्या दावेदार असणार्‍या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या राजकारणाला 2009 नंतर उतरती कळा लागली. अलीकडेच आकाराला आलेल्या ‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीतही त्यांचा समावेश नाही. उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून कमी होणारे समर्थन पाहता ते परत मिळवण्यासाठी मायावतींनी आता स्वबळाचा सूर आळवला आहे; पण यामुळे विरोधकांच्या ऐक्याला धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी अलीकडेच दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केले. त्या म्हणाल्या, एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाडीत आम्ही नसणार आहोत. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकादेखील स्वबळावर लढवू. यावेळी मायावती यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली. आघाडीचे राजकारण काँग्रेस करते आणि त्यांचे जातीयवादी पक्षांशी साटेलोटे आहे, असा आरोप केला. त्याचवेळी भाजपचे दावे खोटे असल्याचेही मायावती म्हणाल्या. आम्ही अशा प्रकारचे खोटे दावे करू शकत नाही, असे त्या म्हणतात. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून एनडीए आणि विरोधी पक्ष यांच्या बैठकीचा जोर वाढला आहे. एकीकडे एनडीए हे संपूर्ण शक्तीनिशी बहुमताचे सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून सत्ताधार्‍यांना पराभूत करण्याची रणनीती आखली जात आहे. यात बहुजन समाज पक्षही मागे नाही. मायावती म्हणतात, काँग्रेस पक्ष हा जातीयवादी पक्ष आणि भांडवलशाही विचार ठेवणार्‍या पक्षांशी आघाडी करून सत्तेत येण्याचे नियोजन करत आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन पुन्हा सत्तेत येण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. सर्व विरोधकांचा एकच विचार असल्यामुळे बसपा त्यांच्यापासून चार हात लांब आहे.

वास्तविक, मायावती यांनी विरोधकांच्या आघाडीच्या प्रयत्नाला सहा महिन्यांपूर्वीच जबरदस्त झटका दिला होता. 15 जानेवारी रोजी त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत बसपच्या रणनीतीची घोषणा केली. त्याच वेळी त्यांनी बसप स्वबळावर लढण्याचे घोषित केले होते. बसप कोणाबरोबरही आघाडी करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एवढेच नाही, तर या वर्षात होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही कोणत्याच पक्षाबरोबर आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले.

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेशमध्ये बसप सुमारे 25 टक्क्यांच्या मतपेढीचे राजकारण करू इच्छित आहे; मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाची स्थिती ढासळत गेली. 2007 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने सर्वव्यापी राजकारण करत राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्याची क्षमता सिद्ध केली होती. या निवडणुकीत बसपच्या एकगठ्ठा मतांबरोबरच दलित, मुस्लिम, ओबीसीबरोबरच ब-ाह्मणांची मते जोडली गेली; मात्र या निवडणुकीनंतर पक्षाची सातत्याने पीछेहाट होऊ लागली. 2009च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. सत्तेत असतानाही राज्यात हा पक्ष तिसर्‍या स्थानावर राहिला. बसपच्या पुढे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस होते. समाजवादी पक्षाला 23 आणि काँग्रेस पक्षाला 21 जागा मिळाल्या. 2007 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत बसपसमवेत गेलेला ब-ाह्मण मतदार हा काँग्रेसकडे आला आणि पूर्ण डावच उलटला. मायावती या आपल्या राजवटीतील विकास आणि कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा उल्लेख आजही करतात; परंतु या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवण्यात त्या यशस्वी ठरल्या नाहीत.

उत्तर प्रदेशात सुमारे तीन कोटी दलित मतदार आहेत आणि सर्वच मते बसपला मिळतातच असे नाही; पण त्यातील मोठा वर्ग हा नेहमीच बसपबरोबर राहिला आहे. बसपचा हुकमी मतदार जाट वर्ग हा यावेळीदेखील त्यांच्यासमवेत राहिला. 2017 च्या निवडणुकीत बसपला 22.23 टक्के मते मिळाली. त्यावेळी पक्षाला 19 जागा मिळाल्या; मात्र यावेळी पक्षाला दहा टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आणि जागादेखील एकच मिळाली; पण दलित मतदार अन्य पक्षांकडे वळणार तर नाही ना, अशी भीती मायावतींना आहे. तशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी भाजप आणि समाजवादी पक्षावर टीका केली. त्याचबरोबर काँग्रेसलादेखील आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. काँग्रेस हा जातीयवादी पक्ष असून या पक्षापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून कमी होणारे समर्थन पाहता ते परत मिळवण्यासाठी मायावती आता स्वबळाची रणनीती आखत आहेत; पण यामुळे विरोधकांच्या ऐक्याला धक्का बसला आहे.

 

 

Back to top button