![सातारा : पळालेला एक दरोडेखोर पकडला; दोघे टप्प्यात](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2Fsatara-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून पाच दरोडेखोरांनी धूमठोक केलेल्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, आणखी दोन दरोडेखोर टप्प्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दरोडेखोरांचे फोटो व्हायरल केले असून, याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. राहुल भोसले असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
दरोडेखोरांनी आज पहाटे ताकदीच्या जोरावर औंध पोलिस ठाण्याचे लॉकअपचे दार तोडून पोलिसांना मारहाण करत पोलिस ठाणे हादरवून सोडले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सातारा पोलिस दल अलर्ट झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या संशयित आरोपींना तीन दरोड्यांच्या गुन्ह्यात अटक केली होती. लॉकअप फोडल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना तात्काळ सर्व दरोडेखोरांना पकडण्याचे आदेश देण्यात आले.
या पहाटे घडलेल्या या घटनेनंतर एलसीबी पथकाने राहुल भोसले या दरोडेखोराला सकाळी पकडले आहे. तो मोठ्या गवतासारख्या झुडपामध्ये लपून बसला होता. दरम्यान, आणखी दोन दरोडेखोरांची माहिती मिळाली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.