‘ससून’चे पोस्टमार्टम : पाटीलच्या अटकेनंतर ‘त्यांचे’ धाबे दणाणले

‘ससून’चे पोस्टमार्टम : पाटीलच्या अटकेनंतर ‘त्यांचे’ धाबे दणाणले

पुणे : ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील पोलिस आणि ससूनमधील डॉक्टरांच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकणार नसल्याचे समोर आले. तब्बल 17 दिवसांनी पाटीलला अटक झाल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या ससूनमधील 'त्या' डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे. ललित पाटील गेल्या तीन वर्षांत काही दिवसांच्या अंतराने तब्बल 16 महिने ससूनमध्ये होता. जून महिन्यात तो पुन्हा अ‍ॅडमिट झाला आणि त्यानंतर कारागृहात परतलाच नाही. ससूनमधून तो ड्रग रॅकेट चालवत होता आणि अधूनमधून बाहेरही जाऊन यायचा, असे चौकशीत समोर आले.

ससूनमधील काही डॉक्टर आणि कर्मचा-यांशी त्याने 'अर्थ'पूर्ण संबंध निर्माण केले होते. त्यामुळे त्याच्या उपचारांविषयी, मुक्कामाविषयी आणि पळून जाण्याविषयी ससून प्रशासनाने अगदी शेवटच्या दिवसापर्यंत चुप्पी साधली आहे. मात्र, आता त्याला अटक झाल्यावर आपले बिंग फुटणार असल्याची भीती संबंधितांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा आहे. पाटीलला सुरुवातीला सर्जरी विभागात दाखल करण्यात आले होते.

तेथील डॉक्टरांनी 'अ‍ॅडमिट करण्याची गरज नाही' असे लिहून देताच त्याला अस्थिरोग विभागातून अ‍ॅडमिट करून घेण्यात आले. त्यानंतर आधी त्याची हर्नियाची शस्त्रक्रिया केली जाणार होती, असे ससूनमधील डॉक्टरांनी सांगितले. हर्नियापूर्वी बेरियाट्रिक सर्जरी केली जाणार असल्याचे डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले आणि सहा डॉक्टरांची टीम उपचार करत असल्याचे स्पष्टीकरणही दिले. त्यामुळे त्याला नेमका काय आजार होता आणि काय उपचार करण्यात येत होते, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

राजकीय दबावाची चर्चा

ललित पाटीलची ससूनमध्ये बडदास्त ठेवली जावी, यासाठी राजकीय व्यक्तींकडून डीनना फोन जात होते, अशी माहितीही समोर आली आहे. पाटीलला अटक झाल्यानंतर मंत्र्यांसह ससूनमधील दोषी डॉक्टरांची नावेही पुढे येणार की प्रकरण जाणीवपूर्वक दाबले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

कैद्यांना 'व्हीआयपी' वागणूक

ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये विविध गुन्ह्यांमधील नऊ आरोपी अनेक महिन्यांपासून उपचारांच्या नावाखाली मुक्कामाला होते. या कैद्यांना वॉर्डमध्ये व्हीआयपी वागणूक दिली जाते, नातेवाईक दिवसभर बसून असतात, घरचे जेवण आणण्याची आणि रुग्णांचा पोशाख न घालता घरचे कपडे घालण्याची परवानगी दिली जाते, असे अनेक कंगोरे समोर आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news