प्रतीक पाटील यांना लोकसभेसाठी हातकणंगले येथून उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांंची मागणी | पुढारी

प्रतीक पाटील यांना लोकसभेसाठी हातकणंगले येथून उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांंची मागणी

इस्लामपूर/ कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे सुपुत्र व राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांना हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी द्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांंनी मुंबई येथे पक्षाच्या आढावा बैठकीत शरद पवार यांच्याकडे केली. त्यामुळे प्रतीक पाटील लोकसभेच्या मैदानात उतरणार, या चर्चांना पुष्टी मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. हातकणंगले मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे असताना काँग्रेसकडूनही या जागेवर दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता शरद पवार गटाकडूनही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या मतदारसंघातील तिढा वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली आहे. मविआच्या जागा वाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची विनंती पदाधिकार्‍यांनी बैठकीत केली. तसेच हातकणंगलेमधून प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आ. बाळासाहेब पाटील, अशोक पवार, माजी आ. हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील – नागराळकर, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, महिला प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर आदी उपस्थित होते.

कोल्हापुरातील जागेवरही दावा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी बुधवारी मुंबईत आढावा बैठकीत सुचविण्यात आले. लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच असून, या जागांवर राष्ट्रवादीचेच उमेदवार देण्याची आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नावांचा आग्रह धरण्यात आल्याचे समजते. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना ही जागा सोडण्यास सर्वच पदाधिकार्‍यांनी विरोध करत, ही जागा राष्ट्रवादीलाच मिळावी, अशी आग्रही मागणी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारीसाठी व्ही. बी. पाटील व प्रतीक पाटील यांची नावे आपण सुचविली असली, तरी यावर अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेणार आहेत. महाराष्ट्रात आपली शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेससोबत आघाडी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बैठक होईल, त्यावेळी या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील, यासाठी आपण निश्चित आग्रही राहू, असे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

या बैठकीत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण कार्याध्यक्षपदी अनिल घाटगे, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण कार्याध्यक्षपदी रावसाहेब भिलवडे यांची, तर इचलकरंजी शहर (जिल्हा) अध्यक्षपदी नितीन जांभळे यांना नियुक्तीची पत्रे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

Back to top button