बेळगाव : संकेश्‍वरमध्ये फिल्मी स्टाईलने हातपाय बांधून दरोडा, आठ लाख लुटले

संकेश्‍वर : चोरट्यांनी विस्कटलेली लोखंडी तिजोरी.
संकेश्‍वर : चोरट्यांनी विस्कटलेली लोखंडी तिजोरी.
Published on
Updated on

संकेश्‍वर : पुढारी वृत्तसेवा

संकेश्‍वर-गडहिंग्लज मार्गावरील किल्लेदार मळ्यामध्ये दोन घरांवर फिल्मी स्टाईलने घरांमधील दोघांचे हातपाय बांधून दरोडा टाकत दरोडेखोरांनी चाकूच्या धाकाने सुमारे आठ लाखांची लूट केली. सोमवारी रात्री 8.15 च्या सुमारास हा प्रकार घडला. घरातील 140 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख 75 हजार रुपये असा ऐवज लुटण्यात आला आहे. दरोडेखोर आठ ते दहा जण होते, असे समजते. घटनेमुळे संकेश्‍वर परिसरामधील शेतवडीमध्ये राहणार्‍या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हातपाय दोरीने बांधले

शशिकांत सातलिंग किल्लेदार आणि राम किल्लेदार यांच्या घरांवर हा दरोडा पडला. घरातील शशिकांत किल्लेदार, त्यांची आई शकुंतला यांचे हातपाय बांधून, प्लास्टिक पट्टीने तोंड बंद करण्यात आले होेते. स्थितीचा अंदाज घेत अज्ञात आठ ते दहा दरोडेखोरांनी किल्लेदार यांच्या घरात घुसून टीव्ही पाहत असलेल्या शकुंतला किल्लेदार यांचे हातपाय दोरीने बांधले. त्यांनी आरडाओरड करताच शकुंतला यांचे तोंड प्लास्टिक पट्टीने बंद केले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाणही केली. त्यानंतर दरोडेखोरांनी शशिकांत यांचेही हातपाय बांधले तसेच त्यांचेही तोंड बंद करून प्लास्टिक बुट्टीने त्यांच्या कपाळावर वार केला. यामध्ये शशिकांत बेशुद्ध पडले. त्यानंतर तिजोरी फोडून त्यातील सोन्याचे 120 ग्रॅमचे दागिने, रोख 75 हजार रुपये आणि राम किल्लेदार यांच्या बंद घराचा कडीकोंयडा तोडून, तिजोरी फोडून 40 ग्रॅम वजनाचे अलंकार, चिल्लर रक्‍कम घेऊन बाहेरून वाहनांचा आवाज येताच पोबारा केला आहे. पोलिसांनी तशी तक्रार नोंदवली आहे.

घटनेची माहिती देताना शकुंतला किल्लेदार म्हणाल्या, तोंडाला कापड गुंडाळलेले तिघे चोर त्यांच्याकडे गेले त्यावेळी त्या टीव्ही पाहत असल्या होत्या. चोरांनी त्यांचे हातपाय बांधले. आरडाओरड करताच त्यांनी माझे तोंड प्लास्टिक पट्टीने बंद केले. मी प्रतिकार करताच त्यांनी मला मारहाण केली. माझ्या तोंडातून रक्‍त वाहू लागल्याने मी भीतीपोटी गप्प बसले. चोर कन्‍नड भाषेतून आपापसामध्ये बोलत होते. चोरांनी आपल्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसकावून काढून घेतली. (Sankeshwar crime)

प्लास्टिक पट्टीने तोंड बंद

शशिकांत किल्लेदार हे डेअरीत दूध घालून घरात प्रवेश करताच पाच दरोडेखोरांनी त्यांना घट्ट पकडले. यानंतर हातपाय बांधून प्लास्टिक पट्टीने तोंड बंद केले. त्यानंतर राम किल्लेदार याच्या घरी कोणीच नसल्याचा फायदा दरोडेखोरांनी घेतला. त्यांची तिजोरी फोडून मुलीची
सोन्याची चेन, कर्णफुले, दोन लेडीज घड्याळेही लांबवली. विशेष म्हणजे गडबडीमध्ये तिजोरीतील एक लाख रुपये न दिसल्याने ते सुरक्षित राहिले .

बेळगांव जिल्हा सहाय्यक पोलीस प्रमुख महानिंग नंदगांवी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. संकेश्वर पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी ,पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी अधिक तपास करीत आहेत.

श्वानपथक घुटमळले

घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ञना पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक किल्लेदारांच्या घरापासून संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर घुटमळले आहे.

पाहा व्हिडिओ : तिसऱ्या जगातला व्हॅलेंटाईन्स डे : तृतीयपंथीयांच्या आजच्या दिवसाच्या काय आहेत भावना?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news