पुढारी ऑनलाईन डेस्क : संजू सॅमसन (Sanju Samson). भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार फलंदाज. मात्र या खेळाडूच्या निवडीवरून अनेकदा गदारोळ होतो. उर्वरित खेळाडूंनुसार सॅमसनला (Sanju Samson) कमी संधी मिळाल्या आहेत. आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेपूर्वी (odi world cup 2023) त्याच्यासाठी पुढील प्रत्येक सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान, त्याच्या विश्वचषकाच्या तिकीटाबाबत एका अनुभवी खेळाडूने मोठे वक्तव्य केले आहे.
संजू सॅमसन (Sanju Samson) मधल्या फळीत फलंदाजीसाठी योग्य आहे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घरच्या मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या (odi world cup 2023) अंतिम 15 मध्ये त्याला स्थान मिळावे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक तिसऱ्या वनडेत दडपणाखाली सॅमसनने अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादवसह (Suryakumar Yadav) मधल्या फळीतील स्थानासाठी झुंज देत त्याने संघातील स्थानावर मजबूत दावा केला आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने मांडले आहे.
श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दुखापतग्रस्त आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे सॅमसन आणि सूर्यकुमारसारख्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. वेस्ट इंडिजमध्ये सूर्यकुमारला चांगली कामगिरी करता आली नाही. मधल्या फळीत भारतीय फलंदाजी मंदावली आहे आणि कैफला वाटते की सॅमसन ही समस्या सोडवू शकेल. तो म्हणाला की, मी सॅमसनच्या खेळीने खूप प्रभावित आहे. चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने चांगले प्रदर्शन केले.'
'इशान किशन आणि अक्षर पटेल यांना मधल्या फळीत खेळवणे अनुकूल नाही. ही चांगली कल्पना नाही. तुम्हाला डावखु-या फिरकीचा सामना करणारा, लेगस्पिन खेळू शकणा-या फलंदाजाची गरज आहे. यात सॅमसन फिट बसतो. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो दबावाखाली खेळला, पण त्याने अर्धशतकी खेळी साकारून विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे सुचित केले,' असेही कैफने सांगितले.
कैफ पुढे म्हणाला की, 'जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) तंदुरुस्त झाला असून त्याचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. तो थेट संघाचा कर्णधार बनला आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे जवळपास वर्षभर मैदानाबाहेर राहिल्यानंतर त्याची ही पुनरागमन मालिका असेल. त्यामुळे त्याच्याकडे सर्वांच्या नकरा लागल्या आहेत. वर्ल्डकपसाठी भारताला पूर्णपणे तंदुरुस्त बुमराहची गरज आहे.'