पुढारी ऑनलाईन
विनोदी आणि गंभीर भूमिकांमध्ये तितक्याच सहजतेनं वावरणारा अभिनेता संजय खापरे "स्टोरी ऑफ लागीरं" या चित्रपटात पोलिसाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. १४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय खापरे यांच्यासोबत रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे हे नव्या दमाच्या कलाकारांचं या चित्रपटातून पदार्पण होत आहे.
स्टोरी ऑफ लागीरं या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. रॉयल समृद्धी असोसिएट्स आणि स्वरुप वैशाली बाळासाहेब सावंत प्रस्तुतकर्ते असून जी. के. फिल्म्स क्रिएशसनं निर्मिती केली आहे. बी. एन. मेश्राम चित्रपटाचे निर्माते, यामिनी वाघडे सहनिर्मात्या आहेत.
रोहित राव नरसिंगे यानी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश गाडेकर यांनी छायांकन, सनी-सुशांत आणि अतुल जोशी यांची संगीत, निहार राजहंस, बी. गोपानारायण यांनी गीतलेखन, मीडिया वर्क्स स्टुडिओने पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी निभावली आहे.
स्टोरी ऑफ लागीरं या नावावरून हा चित्रपट एका गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारा, त्यासोबतच चित्रपटाच्या केंद्रस्थानी प्रेमकथा, राजकारण असल्याचा अंदाज बांधता येतो.
रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव, सोमनाथ येलनूरे यांच्या भूमिका आहेत. तसेच मिलिंद दास्ताने, प्रेमाकिरण असे अनुभवी कलाकारही असल्यानं हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करेल यात शंका नाही.