Sangli News: मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या वडिलाचा खून

Sangli News: मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या वडिलाचा खून

शिराळा : पुढारी वृत्तसेवा : मांगले (ता. शिराळा) येथे प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यात मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. दादासो रामचंद्र चौगुले (वय ५५, रा.मांगले) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांत मारहाणीत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर संशयित सुरेश महादेव पाटील, संजय महादेव पाटील, रविंद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर ( सर्व रा. मांगले) यांना अटक केली आहे. याबाबत मुलाच्या आईने राजश्री दादासाहेब चौगुले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Sangli News

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलीला आज (दि.१७) पहाटे प्रेमसंबंधातून पळवून नेले. दादासो चौगुले व त्यांची पत्नी राजश्री पहाटे मोटरसायकलवरून जनावरांचे दूध काढण्यासाठी मांगले येथील धनटेक वसाहत येथील शेडवर गेले. दादासाहेब चौगुले यांचे शेड व पाटील यांचे राहते घर जवळच आहे. दादासाहेब दूध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी दादासाहेब व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी तुमचा मुलगा घेऊन गेला आहे. ते कोठे गेला आहे, ते सांगा. यावर दादासाहेब म्हणाले की, आम्ही आत्ताच आलो आहे, आम्हाला काही माहिती नाही. Sangli News

त्यावर सुरेश पाटील व अन्य पाच जणांनी दादासाहेब यांना विद्युत खांबाला बांधून घालून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर दादासाहेब बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यांनतर पाटील कुटुंबीयांनी त्यांना येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना पुढील उपचारासाठी शिराळा येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत अटक करण्यात आलेल्या चार संशयितांसह कविता संजय पाटील, पद्दमा सुरेश पाटील, शुभांगी प्रविण पाटील, प्रविण राजाराम पाटील, सनीराज संजय पाटील, संग्रामसिंग भालचंद्र पाटील, सचिन बाबूराव पाटील, अजय अरविंद पाटील, (सर्व रा.मांगले) यांनी दादासाहेबांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दादासो यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सकाळपासून गर्दी केली होती. संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news