सांगली : बाप तुरुंगात, आईचा मृत्यू; अन् खेळायच्या-बागडायच्या वयात दोन चिमुरडी झाली अनाथ | पुढारी

सांगली : बाप तुरुंगात, आईचा मृत्यू; अन् खेळायच्या-बागडायच्या वयात दोन चिमुरडी झाली अनाथ

गणेश मानस

सांगली : बाप तुरुंगात गेला, आईचा मृत्यू झाला. परिणामी दोन बालके अनाथ झाली. हळहळायला लावणारी ही घटना. खेळायच्या-बागडायच्या वयात या चिमुरड्यांचे आधाराचे छत्रच हरवले. त्याचे वय 35, तर तिचे वय 32. चिमुरडी 9 वर्षांची, तर चिमुरडा अवघा 2 वर्षांचा. झाले काय, तर तो बिहारचा आणि ती कर्नाटकातील. दोघांचे प्रेम जमले. दोघांच्या कुटुंबांचा विरोध. तो झुगारून त्यांनी लग्न केले. संसार सुरू झाला. दोन गोंडस मुले जन्मली. कुपवाड येथे भाड्याच्या घरात संसार सुरू केला. तो गुन्हेगारी वृत्तीचा. त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. आता तो पुणे येथील कारागृहात आहे.

सुखी संसाराची स्वप्ने पाहणार्‍या तिच्यावर आभाळ कोसळले. कुपवाड सोडून तिने सांगली गाठली. काम करून कसेबसे दोन मुलांना सांभाळू लागली. काही दिवसांपूर्वी तोल जाऊन ती पडली आणि जखमी झाली. तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि अखेर तिला मृत्यूने गाठले.

येथील माळी गल्लीत भाडेकरू म्हणून राहणारी बेबी गजराज वर्मा (वय 32) हिची ही कथा. ती मूळची कर्नाटकची. बिहारहून कामासाठी आलेला तरुण गजराज वर्माशी तिचे प्रेम जमले. त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना काजल (9) ही मुलगी, तर इंद्रनील (2) हा मुलगा. पती गुन्हेगार असल्यामुळे तिला कुपवाड येथील भाड्याचे घर सोडावे लागले. तिने सांगलीतील माळी गल्लीत भाड्याने घर घेतले. मुलांच्या संगोपनासाठी पडेल ते काम ती करू लागली. 26 डिसेंबर 2023 रोजी घरातील कामे करीत असतानाच ती जागेवरच कोसळली. त्यात ती जखमी झाली. स्थानिकांनी तिला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. पण गेल्या पाच जानेवारी रोजी तिचे निधन झाले. दोन्हीही मुले शेजार्‍यांकडे होती. आता त्यांचे पालकत्व कोण घेणार, हा मोठा प्रश्न. पोलिसांना याची माहितीही नव्हती. अखेर शेजारी राहणार्‍या अनिता होवाळ यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांना ही माहिती दिली. त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या तपास अधिकार्‍यांना याची कल्पना दिली. बाल संगोपनचे माजी अध्यक्ष डॉ. गौतम प्रज्ञासूर्य यांच्याशी संपर्क साधला. मुलांना सुरक्षित बाल संगोपन केंद्रात दाखल केले.

गेल्या दहा दिवसांपासून मिरज शासकीय रुग्णालयामध्येे बेवारस असलेल्या बेबी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत ठोकळे व यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि तिला कायमचा निरोप दिला.

Back to top button