

कासेगांव; पुढारी वृत्तसेवा : वाटेगांव ( ता. वाळवा ) येथील संतोष भुजंग कोळी (वय २७ ) या युवकावर काळमवाडी -भाटवाडी रस्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले . ही घटना रात्री ९च्या दरम्यान घडली आहे. यामुळे भाटवडे, काळमवाडी, केदारवाडी, वाटेगाव, शेणे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे .
अधिक माहीती अशी की, संतोष कोळी व शेखर मधुकर साठे ( रा. वाटेगाव ) हे स्पर्धा परिक्षा देणेसाठी मोटरसायकलने कोल्हापूर येथे गेले होते. रात्री घरी येत असताना ९ वाजताच्या दरम्यान काळमवाडी पास करून भाटवडे नजिक अचानकपणे बिबट्याने गाडीवरती झेप मारली .व संतोष कोळी याला पंजा मारून जखमी केले .सुदैवाने गाडीचा वेग असल्याने दोघे बचावले .जखमी कोळी यास वाटेगाव येथे खाजगी दवाखान्यात दाखल करून उपचार केले आहेत . सदर हल्याने दोन्ही युवक नशिब बलवत्तर म्हणून बचावले . या रात्रीच्या घटनेने वाटेगाव परिसरात भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे .