पुढारी ऑनलाईन: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 'एनसीबी'चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेवर (Aryan Khan case) आज मुंबई उच्च न्यायालयात आज (दि.२२) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
समीर वानखेडे यांनी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये. सीबीआयला तपासात सहकार्य करावे, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती साेशल मीडिया किंवा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला पाठवू नयेत, अशी सूचना देत न्यायालयाने समीर वानखेडे यांना पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा वानखेरे यांच्यावर आराेप आहे. याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका वानखेडे यांनी दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
आर्यन खान अटक प्रकरणात शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान अटकेत असताना, शाहरूखसोबत बोलणे झाल्याचे समीर वानखेडे यांनी एनसीबीपासून लपवले, असा आरोप देखील सीबीआयकडून करण्यात आला आहे. यासंबंधी समीर वानखेडे यांची सलग २ दिवस ३ तास सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच यासंबंधी सीबीआयने काही ठिकाणी छापेही टाकले आहेत. यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचा आरोप करत, एफआयआर दाखल करण्यात आला आहे.