व्हॉटस्अॅप चॅट उघड करून समीर वानखेडे यांनी केला नियमभंग; एनसीबीचा आरोप

मुंबई; पुढारी डेस्क : अटकेतील आर्यन खानबाबत बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानसोबत झालेले व्हॉटस्अॅप चॅट हा नियमांचा भंग असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. एवढेच नव्हे तर वानखेडे यांनी संशयित आरोपीच्या कुटुंबीयांशी चॅटद्वारे संपर्क साधलाच कसा, असा प्रश्न एनसीबीने उपस्थित केला आहे.
आर्यन खान प्रकरणाला दिवसागणिक निराळे वळण मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात सीबीआय कारवाईच्या विरोधात याचिका सादर करताना समीर वानखेडे यांनी शाहरूख खानसोबत झालेल्या व्हॉटस्अॅप चॅटचा काही भाग सादर केला होता. तसेच याचिकेदरम्यान एनसीबीमध्ये आपल्याला त्रास देण्यात आल्याचा व शाहरूखच्या मुलाला बाहेर काढण्यासाठी सीबीआयचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
यावर रविवारी एनसीबीच्या वतीने वानखेडे यांच्यावरच आरोप करण्यात आले. वानखेडे यांनी शाहरूख खानसोबत झालेले व्हॉटस्अॅप चॅट उघड करून वानखेडे यांनी नियमांचा भंग केला आहे, अशी माहिती एनसीबीच्या अधिकार्यांनी दिली. वरिष्ठांना कळवण्याआधी वानखेडे यांनी संशयित आरोपीच्या कुटुंबीयांशी चॅटद्वारे संपर्क साधलाच कसा, असा प्रश्न एनसीबीने उपस्थित केला आहे. तसेच शाहरूख खानशी व्हॉटस्अॅप चॅटसाठी वापरलेला फोन उपलब्ध करून देण्यात वानखेडे असमर्थ ठरल्याचेही एनसीबीने म्हटले आहे. त्याचबरोबर हे प्रकरण दुसर्या अधिकार्याकडे सोपवण्यात आल्यानंतर त्याला धमकावण्याचा प्रयत्नही केला गेल्याचा आरोप एनसीबीने केला आहे.
सलग दुसर्या दिवशी चौकशी
अटकेची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या समीर वानखेडे यांची शनिवारी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील सीबीआयच्या कार्यालयात पाच तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.