पुढारी ऑनलाईन डेस्क
Winter Paralympics 2022 : रशियन आणि बेलारूस खेळाडूंना बिजिंग हिवाळी पॅरालिम्पिकमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. रशियाचे युक्रेनवर आक्रमण सुरुच आहे. त्यात बेलारुसने रशियाला समर्थन दिले आहे. युक्रेनमधील युद्धाबाबत या देशांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांच्या देशातील खेळाडूंना हिवाळी पॅरालिम्पिक गेम्समध्ये बंदी घातली आहे. याबाबतचा निर्णय आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने गुरुवारी बीजिंगमध्ये जाहीर केला. पॅरालिम्पिक गेम्स येत्या शुक्रवारपासून सुरु होत आहेत.
राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय चिन्हांशिवाय जे खेळाडू स्पर्धेत उतरतील त्यांनाच शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली जाईल, असे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने (IPC) बुधवारी स्पष्ट केले होते. आयपीसीच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली होती. हा विश्वासघात असून यामुळे रशियाच्या नेतृत्वाकडे चुकीचा संदेश गेला, असे आरोप झाले. यावर आयपीसीने स्पष्ट केले की अनेक खेळाडू रशियन किंवा बेलारुसच्या खेळाडूंविरुद्ध खेळण्यास नकार देतील. यामुळे स्पर्धेदरम्यान गोंधळ निर्माण होऊन पॅरालिम्पिकची प्रतिष्ठा (Winter Paralympics 2022) खराब होईल.
आयपीसीचे अध्यक्ष अँड्र्यू पार्सन्स यांनी पुढे स्पष्ट केले आहे की, रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना भाग घेण्याची परवानगी मिळाल्यास आम्ही हिवाळी पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणार नाही, अशी भूमिका बहुतांश देशांनी घेतली आहे. रशियन आणि बेलारुसच्या खेळाडूंना त्यांनी "तुमच्या सरकारच्या कृतींचे बळी" म्हणून संबोधले आहे. खेळ आणि राजकारण यांची सांगड घालू नये यावर आमचा ठाम विश्वास आहे. खेळाडूंची सुरक्षितता सुनिश्चित करणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याआधी फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने (FIFA) मोठी घोषणा करत रशियाला मोठा धक्का दिला होता. रशियावर बंदी घालत फिफाने यापुढे रशियाच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार नसल्याचे जाहीर केले होते. इतकंच नाही तर रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत यांना परदेशात फिफाच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर फिफाने अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. (FIFA Bans Russia)