Russian invasion of Ukraine : रशियन सैन्यानं खेरसन शहर घेतलं ताब्यात, युक्रेनमधील ५ शहरे उद्ध्वस्त | पुढारी

Russian invasion of Ukraine : रशियन सैन्यानं खेरसन शहर घेतलं ताब्यात, युक्रेनमधील ५ शहरे उद्ध्वस्त

कीव्ह; पुढारी ऑनलाईन

सलग आठव्या दिवशी रशियाचे युक्रेनवर आक्रमण (Russian invasion of Ukraine) सुरुच आहे. रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या दक्षिणेकडील खेरसन या महत्वाच्या शहरावर ताबा मिळवला असल्याचे वृत्त आहे. रशियन सैन्याने दक्षिणेकडील युक्रेनच्या खेरसन शहरात धडक दिली असून त्यांनी कौन्सिलच्या इमारतीत प्रवेश केला आहे. या वृत्ताला खेरसन शहराच्या महापौरांनी पुष्टी दिली आहे.

रशियन सैन्याला युक्रेनमधील सरकारला उलथवून टाकणे अद्याप शक्य झालेले नाही. पण त्यांनी केलेल्या हल्ल्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे ८ लाख ७० हजार युक्रेनियन नागरिकांना देश सोडून शेजारील देशांत आश्रय घ्यावा लागला आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सकाळी सांगितले होते की त्यांनी खेरसनवर ताबा मिळवला आहे. परंतु काही तासांनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या सल्लागाराने युक्रेन सैन्य या ठिकाणी तीव्र प्रतिकार करत असल्याचे म्हटले होते.

दक्षिण प्रांताची राजधानी असलेल्या खेरसन शहराची लोकसंख्या सुमारे अडीच लाख आहे. येथील निप्रो नदी काळ्या समुद्राला जाऊन मिळते. हे महत्वाचे शहर आता रशियाच्या ताब्यात गेले आहे.

दरम्यान, बुधवारी उशिरा खेरसनचे महापौर इगोर कोलीखायेव यांनी, रशियन सैन्य शहरातील रस्त्यावर असल्याची माहिती दिली होती. रशियाने युक्रेनमधील त्यांच्या कारवाईला विशेष ऑपरेशन म्हटले आहे. पण रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील कीव्हसह अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. १५ लाख लोकसंख्येच्या खार्कोव्ह शहरात बॉम्बस्फोटामुळे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, तिसरे महायुद्ध झालेच, तर त्याचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतील, अण्वस्त्रांचा सर्रास वापर केला जाईल, अर्थातच आमच्याकडूनही हे घडेल, अशी उघड धमकी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव्ह यांनी दिली आहे. इकडे कीव्ह, खार्कोव्हसह युक्रेनच्या अनेक प्रमुख शहरांवर बुधवारी रशियाने लागोपाठ हल्ले केले.

एकट्या खार्कोव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात २१ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर ११२ जखमी झाले. भारतीय विद्यार्थ्यांनी खार्कोव्ह सोडावे, अशी आणीबाणीची ‘अ‍ॅडव्हायझरी’ बुधवारी भारतीय दूतावासाने जारी करताच खार्कोव्हवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला झाला. खार्कोव्हमध्ये अजूनही भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. अनेक जण रेल्वेस्थानकांवर प्रतीक्षा करत आहेत, तर अनेक जण विशेषत: विद्यार्थी पायीच खार्कोव्ह सोडून निघाले आहेत.

Russian invasion of Ukraine : युक्रेनमधील ५ शहरे उद्ध्वस्त

रशियन हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील कीव्ह, खार्कोव्ह, बुका, मारियुपोल आणि जितोमीर या शहरांवर बुधवारीही रशियाने बॉम्ब हल्ले केले. या शहरांतील अनेक परिसर पुरते उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यांवर पडलेली प्रेते उचलणारेही कुणी नाही. पाच लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून स्थलांतर केले आहे. कीव्ह, लीव्हसह अन्य शहरांतील रेल्वेस्थानकांवर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. कीव्हनजीक असलेल्या बुका या शहरात रशियन सैनिकांनी कहर केला. युक्रेनियन लष्करानेही प्रतिहल्ले केले. रशियन रणगाडे या हल्ल्याचे लक्ष्य होते. शहरातील रस्त्यांवर सर्वत्र रणगाड्यांचे भाग इतस्तत: विखुरलेले आहेत. युक्रेनियन सैनिकांसह स्थानिक लोकही रशियन सैनिकांवर गनिमी काव्याने हल्ले करीत आहेत. रशियन सैनिकांना त्यामुळे पुढे सरकणे अवघड झाले आहे.

Back to top button