पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत सोलापूरचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रयत्न झाला याचा निषेध केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, " यापुढंही पदोपदी त्यांना लोकांच्या संतापाला आणि विरोधाला अधिक तीव्रतेने सामोरं जावं लागेल."( Rohit Pawar)
आमदार रोहित पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकारवर निशाणा साधत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला त्याचा निषेध केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,"हे सरकार आल्यापासून त्यांची धोरणं ही युवांविरोधी असल्याने युवांमध्ये संतापाची लाट आहे. पण या संतापाला वाट करुन देऊन सरकारला वाटेवर आणण्याचे अनेक सनदशीर मार्गही उपलब्ध आहेत. त्यामुळं मंत्र्यांवर शाईफेक करणं चुकीचं असून चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील शाईफेकीचा मी विरोध करतो. यासोबतच सरकारनेही गेंड्याची कातडी पांघरून न बसता लोकांमधील संताप लक्षात घेऊन आपली जनहितविरोधी धोरणं बदलावीत. अन्यथा यापुढंही पदोपदी त्यांना लोकांच्या संतापाला आणि विरोधाला अधिक तीव्रतेने सामोरं जावं लागेल."
नुकतचं चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच रविवारी (दि.१५) सोलापूर दौऱ्यावर होते. त्यादरम्यान शासकीय विश्रामगृह येथे भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्याने राज्य शासनाने सरकारी नोकरीमध्ये सुरु केलेल्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी हा प्रकार केलं असल्याच सांगण्यात येत आहे. सदरील व्यक्तीला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाई फेकण्यात आली होती.
हेही वाचा