पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या सभाेवताली अशी काही लोक असतात जी आपल्या खडतर परिस्थितीमध्ये आशा न गमावता आपल्या परिश्रमाने आणि धाडसी वृत्तीने खडतर परिस्थिती बदलवत असतात आणि अभूतपूर्व असं यश मिळवत असतात. अशीच एका तरुणाची यशोगाथा आहे. त्याची यशोगाथा पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य आणि उर्जा मिळेल. ही गोष्ट आहे दिलखुश कुमार या तरुणाची. वाचा दिलखुश कुमारने नेमकं काय केलं. ज्याच्यामुळे त्याची वाहवा होत आहे. (Rodbez Startup)
दिलखुश कुमार बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील बनगाव या छोट्या गावातील तरुण. तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता त्याचबरोबर जोडधंदा म्हणूनही भाजी विकायचा. पण दिलखुशने आपल्या कष्टाच्या जोरावर असं काही केलं की तो आता रॉडबेझ या करोडो रुपयांच्या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहे.
दिलखुश सांगतो की, आयआयटी गुवाहाटी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून पदवीधरांना रॉडबेझमध्ये काम करण्यासाठी नियुक्त केले गेले आहे. आयआयएममधील काही विद्यार्थीही अर्धवेळ तत्त्वावर त्यांच्या स्टार्टअपमध्ये काम करत आहेत. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देताना दिलखुश सांगतो की, तो दिल्लीत रिक्षाचालक म्हणून काम करायचा. पाटण्यातही रस्त्यावर भाजी विकायचा. जेव्हा तो गार्डच्या नोकरीसाठी मुलाखतीसाठी जायचा तेव्हा त्याला अशिक्षित समजलं जायचं. एका मुलाखतीमध्ये त्याला आयफोनचा लोगो ओळखण्यास सांगितले होते, पण तो ओळखू शकला नाही. कारण तो प्रथमच आयफोन पाहत होता. त्याच्या व्यवसायावर कुटुंबाचं पोटापाणी होतं. त्याने आपल्या कुटुंबासाठी कधीही हार मानली नाही.
दिलखुशचे वडील हे बस ड्रायव्हर होते. बस ड्रायव्हर असलेल्या वडिलांकडून तो गाडी चालवायला शिकला. पैशाअभावी त्याने बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आणि पैसे कमावण्यासाठी गाडी चालवायला सुरुवात केली. पण त्याचा धडपडी स्वभाव त्याला गप्प बसू देत नव्हता. त्याला स्वत:चे काहीतरी सुरु करायचे होते. त्याला बिहारमध्ये टॅक्सी सेवा उपलब्ध करून द्यायची होती. म्हणून त्याने रॉडबेझ स्टार्टअप सुरू केले. हे स्टार्टअप इतर टॅक्सी सेवा पुरवठादार, उबेर किंवा ओलासारखे नाही. ही मूलत: एक डेटाबेस कंपनी आहे. जी ग्राहकांना टॅक्सी चालकांशी जोडते आणि 50 किमी पेक्षा जास्त अंतराच्या बाहेरच्या प्रवासासाठी वाहने पुरवते.
दिलखुशने रॉडबेझची सुरुवात सेकंड-हँड टाटा नॅनोने केली. पण रॉडबेझ सुरू केल्यानंतर ६-७ महिन्यांत दिलखुश आणि त्यांची टीम ४ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात यशस्वी झाली. सध्या, कंपनी पहिल्या टप्प्यात पाटणा ते बिहारमधील प्रत्येक गावात सेवा देत आहे. दुसऱ्या टप्प्यात ते शहर ते शहर जोडणार आहेत. बिहारमधील प्रत्येक गाव टॅक्सीने जोडण्याचे त्यांचे ध्येय आहे. नंतर, बिहारच्या बाहेरही सेवांचा विस्तार करण्याचा त्याचा विचार आहे.
हेही वाचा