‘आपले सरकार केंद्र’ गेल्या पाच महिन्यांपासून आयडीच्या प्रतीक्षेत | पुढारी

‘आपले सरकार केंद्र’ गेल्या पाच महिन्यांपासून आयडीच्या प्रतीक्षेत

शेटफळगढे; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य नागरिकांची होणारी धावपळ कमी करण्यासाठी शासकीय दाखले गावोगावी उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आपले सरकारचे आयडी तयार होऊनदेखील इंदापूर तालुक्यात पाच महिन्यांपासून आयडी वाटप न झाल्याने येथील 24 केंद्र हे प्रतीक्षेत आहेत.

राज्य शासनाने 1 जानेवारी 2018 ला घेतलेल्या निर्णयानुसार पुणे जिल्ह्यात 781 ठिकाणी आपले सरकार केंद्र चालू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने अर्ज मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागांत 639 ठिकाणी केंद्र सुरू करण्याचे नियोजन होते, तर पुणे शहरात 74, पिंपरी-चिंचवडमध्ये 45 ठिकाणी आणि जिल्ह्याच्या नगरपालिका कार्यक्षेत्रात 15 ठिकाणी, तर मंडळांच्या कार्यक्षेत्रातील 8 ठिकाणी असे एकूण 481 ठिकाणी आपले सरकार केंद्र चालू करण्यासाठी आज मागविले होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणाहून आयडी वाटप केले जाणार होते. आपले सरकार केंद्राची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील केंद्राचे आयडी वाटप नसल्याने अनेक गावची आपले सरकार केंद्रे सुरू झालेली नाहीत. जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांत केंद्रांचे वाटप झाले आहे; मात्र, इंदापूर तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात प्रक्रिया पूर्ण करूनदेखील अजून वाटप केलेले नाही.

जिल्ह्यातील तालुकानिहाय नवीन केंद्रांची यादी
आंबेगाव 25, बारामती 15, भोर 28, दौंड 16, हवेली 31, इंदापूर 24,
जुन्नर 21, खेड 37, मावळ 25, मुळशी 30, पुरंदर 24, शिरूर 16, वेल्हा 6.

वकरच आयडीचे वाटप
इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील आयडी वाटप रखडले आहे. ते आयडी वाटप लवकरच केले जाणार आहे.

Back to top button