पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला तर भारताचे तिसऱ्यांदा विजेतेपदाचे स्वप्न भंगले. भारताच्या पराभवानंतर या सामन्याचे अम्पायर इंग्लडचे रिचर्ड कॅटलबरोही चर्चेत आहेत.
संबंधित बातम्या :
फायनलमध्ये मैदानावर अम्पायर म्हणून काम पाहिलेले कॅटलबरो यांचे काही निर्णय भारताच्या बाजूने नव्हते. एका प्रसंगी कॅटलबरो यांनी मार्नस लॅबुशेनविरुद्धचे एलबीडब्ल्यू अपील नाकारले. भारताने रिव्ह्यू घेतला, पण तो अम्पायरचा कॉल निघाला. त्या प्रसंगी कॅटलबरो यांनी लॅबुशेनला बाद केले असते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
चाहत्यांचा असा समज आहे की, रिचर्ड कॅटलबरो जेव्हा जेव्हा मोठ्या सामन्यांमध्ये अम्पायर म्हणून असतात, तेव्हा टीम इंडियासाठी बॅडलक ठरते. आकडेवारीही याच दिशेने निर्देश करते. कॅटलबरो हे न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक (२०१९) उपांत्य फेरीतील आणि टी-२० विश्वचषक (२०२१) सामन्यांमध्ये मैदानावर अम्पायर होते. दोन्ही सामन्यात भारताचा पराभव झाला होता.
कॅटलबरो हे माजी क्रिकेटर आहेत. त्यांनी ३३ प्रथम श्रेणी आणि २१ लिस्ट-ए सामन्यांमध्ये एकूण १४४८ धावा केल्या. भारत-ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यातही इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे अम्पायर होते. रिचर्ड इलिंगवर्थ हे देखील माजी क्रिकेटपटू आहेत. ६० वर्षीय रिचर्ड इलिंगवर्थ यांनी इंग्लंडकडून ९ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
हेही वाचा :