नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा – नैसर्गिक संकटांच्या वेळी दिली जाणारी प्रतिक्रिया वेगवेगळी असू नये तर ती एकीकृत असावयास हवी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( दि. ४ ) केले. 'डिजास्टर रिसायलन्ट इन्फ्रास्ट्रक्चर' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 'सीडीआरआय' संस्थेच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
आपसांमध्ये जोडल्या गेलेल्या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम हा केवळ स्थानिक नसतो तर त्याचा प्रभाव मोठ्या भागांवर पडत असतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीला दिली जाणारी प्रतिक्रिया एकीकृत असली पाहिजे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील या परिषदेत केवळ सरकारे सामील आहेत असे नाही. जगभरातील प्रतिथयश संस्था आणि खाजगी कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे, ही उत्साहवर्धक बाब आहे. काही वर्षातच चाळीसपेक्षा जास्त देश 'सीडीआरआय' चा भाग बनले आहेत. सीडीआरआय हा महत्वपूर्ण मंच बनत चालला आहे. विकसित अर्थव्यवस्थांसोबत विकसनशील अर्थव्यवस्था, छोटे-मोठे देश नैसर्गिक आपत्तीला मुकाबला करण्याच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
वाहतुकीची पायाभूत सुविधा जितकी महत्वपूर्ण आहे, तितकेच सोशल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचे आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, याआधी झालेल्या दुर्घटनांतून शिकणे हेदेखील काळानुरुप गरजेचे बनले आहे. प्रत्येक देश वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत असते. पायाभूत सुविधांचा विकास करीत असताना भावी नैसर्गिक आपत्तीचा विचार करुन स्थानिक ज्ञान व माहितीचा वापर करणे तितकेच आवश्यक आहे.
हेही वाचा :