मिळकतकर भरण्यासाठी ऑनलाइनची क्रेझ, दोन महिन्यांत 117 कोटींचा भरणा

मिळकतकर भरण्यासाठी ऑनलाइनची क्रेझ, दोन महिन्यांत 117 कोटींचा भरणा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

मिळकतकराची बिले भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. एक एप्रिल ते 31 मे या दोन महिन्यांच्या कालावधीत एकूण 93 हजार 988 नागरिकांनी एकूण 117 कोटी 30 लाख 45 हजारांचा भरणा केला आहे. ऑनलाइनने सर्वांधिक 72 हजार नागरिकांनी घरबसल्या बिल अदा केले आहे.

मिळकतकराची सन 2022-23 वर्षाची बिले पोस्टाने घरोघरी पाठविण्यात येत आहेत. घरपोच बिले मिळाल्याने नागरिक बिल भरण्यास पुढे येत आहेत. एक एप्रिल ते 31 मे या या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 1 लाख नागरिकांनी बिलांचा भरणार केला आहे. त्या सर्वाधिक 71 हजार 889 नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या बिल भरले आहे. त्यातून एकूण 84 कोटी 18 लाख 25 हजार रूपयांचा भरणा झाला आहे. तसेच, एनईएफटी, आरटीजीएस आदी माध्यमाचा वापर करूनही बिले भरण्यात आली आहेत.

रोखीने केवल 17 हजार 605 जणांनी एकूण 12 कोटी 85 लाख 45 हजारांचे बिल भरले आहे. धनादेशाद्वारे 4 हजार 50 मिळकतधारकांनी एकूण 12 कोटी 27 लाख 54 हजारांचे बिल अदा केले आहे. डीडीद्वारे 85 नागरिकांनी 1 कोटी 51 लाख 34 हजार रूपये भरले आहेत. पहिल्या सहामाहीपूर्वी बिल भरल्याने तसेच, ऑनलाइन भरणा केल्याने सामान्यकरातील सवलतीचा लाभ त्या नागरिकांना मिळाला आहे.

4 लाख 74 हजार 831 बिले पोस्टाने घरपोच

मिळकतकराची बिले यंदापासून पोस्टाने घरोघरी पाठविली जात आहेत. आतापर्यंत 4 लाख 74 हजार 831 बिलांचे वितरण करण्यात आले आहे. बिले वाटपास 9 मे रोजी सुरूवात करण्यात आली आहे. शहरातील विविध 16 पोस्ट कार्यालयातून बिलाचे वितरण केले जात आहे. त्यासाठी पालिकेने पोस्टाला खर्च अदा केला आहे.

बिल भरून सवलतीचा लाभ घ्या

पहिल्या सहामाहीत म्हणजे 30 जूनपर्यंत थकबाकीसह सर्व बिल अदा केल्यास सामान्यकरात 10 टक्के सवलत दिली जाते. ऑनलाइन भरणा केल्यास 5 टक्के सवलत आहे. तसेच, महिलेच्या नावाने मिळकत असल्यास सामान्यकरात 50 टक्के सवलत दिली जाते. नागरिकांनी बिल अदा करून विविध सलवतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

असा झाला भरणा

पद्धत           मिळकतधारक                रक्कम

रोख                17 हजार 605            13 कोटी 85 लाख 45 हजार
ऑनलाइन       71 हजार 889            84 कोटी 18 लाख 25 हजार
धनादेश           4 हजार 50               12 कोटी 27 लाख 54 हजार
डीडी              84                           1 कोटी 51 लाख 34 हजार
एनईएफटी      22                            63 लाख 82 हजार
आरटीजीएस   58                           5 कोटी 49 लाख 68 हजार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news